पीपीई कीट परिधान करून वॉर्डमध्ये फेरफटका : रुग्णांच्या नातेवाईकांचा वाद घालण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी / बेळगाव
बिम्स्च्या सीईओ सईदा आफरीन बानु बळ्ळारी यांनी सोमवारी पीपीई कीट परिधान करून कोविड वॉर्डचा फेरफटका मारला. इस्पितळाच्या आवारात तळ ठोकलेल्या कोरोना बाधितांच्या नातेवाईकांना तेथून बाहेर पाठविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
राज्याचे मुख्य सचिव रविकुमार यांनी आपल्या बिम्स् दौऱयाच्यावेळी बाधितांच्या नातेवाईकांना वॉर्डबाहेर पाठवा. अनावश्यकपणे वॉर्डमध्ये फिरणाऱयांना कोरोना होण्याचा धोका असतो. त्यामुळे रुग्णसंख्या वाढणार आहे, अशी सूचना केली होती. त्यानंतर बिम्स् प्रशासनानेही यासंबंधी आदेश जारी केले होते.
एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्यावर तेथील सुरक्षिततेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पोलीस होमगार्ड व खासरी सुरक्षारक्षकांना मार्गदर्शन करून कोणत्याही परिस्थितीत कोरोना बाधितांच्या नातेवाईकांना कोविड वॉर्डमध्ये प्रवेश देवू नका, अशी सूचना पोलीस अधिकाऱयांनीही केली
होती.
सोमवारी बिम्स्चे प्रशासकीय अधिकारी सईदा आफरीन बानु बळ्ळारी यांनी पीपीई कीट परिधान करून वॉर्डजवळ उभे असलेल्या बाधितांच्या नातेवाईकांना तेथून बाहेर पाठविले. बाधितांजवळ ठाण मांडला तर तुमच्या आरोग्यालाही धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे त्यांच्यापासून दूर रहा, असा सल्ला त्यांनी नातेवाईकांना दिला.
काही रुग्णांच्या नातेवाईकांनी अधिकाऱयांशी बाहेर जाण्याच्या सूचनेवरून वाद घातला. मात्र त्यांची मनधरणी करण्यात आली. यावेळी बिम्स्चे वैद्यकीय संचालक डॉ. गिरीश दंडगी, पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी आदी उपस्थित होते.