प्रतिनिधी/ मडगाव
‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे गोवा केंद्र सरकारला नवीन जीएसआर तयार करण्यासाठी आवश्यक ?सूचना करून मदत करू शकते. सरकार त्यांचे सहकार्य घेण्यास तयार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया गोवा केंद्राचे नूतन अध्यक्ष व 2022-23 सालासाठीच्या समितीचा अधिकारग्रहण सोहळा मडगाव येथे पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री काब्राल उपस्थित होते.
नैसर्गिक वाळू उत्खनन करण्यावर सध्या मर्यादा आल्या असून नवीन तंत्रज्ञान वापरून वाळूऐवजी अन्य पर्याय उपलब्ध होऊ शकतात काय याबद्दल आवश्यक सूचना आपली संघटना करू शकते, असे काब्राल म्हणाले. गोवा केंद्राच्यावतीने नुकतीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचे एक निवेदन सादर करण्यात आले होते. सदर निवेदनाची प्रत मंत्री काब्राल यांना यावेळी देण्यात आली
सदर निवेदनात बिल्डर क्षेत्रातील विविध पैलू व कौशल्य शिकविण्यासाठी केंद्र उभारण्याचा विचार व्यक्त करून त्यासाठी सरकारने जागा उपलब्ध करावी या मागणीचा समावेश आहे. यासंदर्भात बोलताना मंत्री काब्राल यांनी जागा देण्याबाबत स्पष्टपणे आश्वासन देणे शक्मय नसले, तरी राज्यात कित्येक आयटीआय असून तेथील प्रशिक्षकवर्गाला आवश्यक ज्ञान मिळाले, तर ते विद्यार्थ्यांचे कौशल्य सुधारण्यात भर घालू शकतात, याकडे लक्ष वेधले. त्यामुळे प्रशिक्षकवर्गाला आवश्यक मदत करण्याची गरज काब्राल यांनी व्यक्त केली.
काही बिल्डर्स राज्यात गगनचुंबी इमारती उभारतात. मात्र अशा इमारतींमध्ये पाणीपुरवठा होऊ शकत नसतो. तसेच काही जण शेकडो फ्लॅट उभारतात. मात्र पाण्याच्या जोडण्या नसल्याने अशा इमारतींना पाणीपुरवठा होत नसतो व त्यांना टँकरचा आधार घ्यावा लागतो असे आपल्या नजरेस आले आहे. अशावेळी सरकारचे संबंधित खाते, बिल्डर्स यांनी एकत्रितपणे जनतेच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मंत्री काब्राल म्हणाले.
गोवा केंद्राचे नवीन अध्यक्ष म्हणून यतीन पै यांनी बीएआयचे अध्यक्ष नीमेश पटेल यांच्या हस्ते पदाचा ताबा घेतला. यावेळी राजेंद्र आठवले, नीरव परमार सन्माननीय अतिथी म्हणून तसेच गजानन सावंत, त्रिविक्रम प्रभुगावकर, तेजस तालक, दीपक तळावलीकर, नीरेश नाईक, गौरव खंवटे उपस्थित होते.c
नवीन झुआरी पुलाची एक बाजू सप्टेंबरपर्यंत खोलण्याची योजना
आपल्याला या कार्यक्रमाला येण्यास वाहतूक कोंडीमुळे उशीर झाला. झुआरी पुलावर ही समस्या भेडसावत असते. पण नवीन झुआरी पुलाची एक चौपदरी बाजू ऑगस्ट-सप्टेंबर महिन्याच्या अखेरीसपर्यंत खुले करण्याची योजना आहे. त्यानंतर या वाहतूक कोंडीवर उतारा निघेल, असे काब्राल यांनी यावेळी स्पष्ट केले.