वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर) आर. के. सचेती यांचे मंगळवारी कोरोनाच्या बाधेमुळे निधन झाले. ते 56 वर्षांचे होते.
दीर्घ काळापासून फेडरेशनच्या प्रशासकीय सेवेत असणारे सचेती गेल्या काही दिवसापासून येथील हॉस्पिटलमध्ये कोरोनाशी संघर्ष करीत होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ‘कळविण्यास अत्यंत दुःख होते की, बीएफआयचे कार्यकारी संचालक आर के सचेती यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या जाण्याने क्रीडा वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे,’ असे बीएफआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ते राष्ट्रीय फेडरेशनचे जीवन व आत्मा होते, अशा भावना बीएफआय अध्यक्ष अजय सिंग यांनी व्यक्त केल्या. ‘गेल्या काही वर्षात भारतीय मुष्टियुद्धाने प्रगती करून जी उंची गाठली आहे, त्यात सचेती यांचेच मोठे योगदान आहे. यापुढे त्यांची उणीव आम्हाला सतत जाणवत राहील. भारतीय मुष्टियुद्ध जगत तुम्हाला मिस करेल. आम्हाला तुमचा कायम अभिमान वाटत राहील,’ असे अजय सिंग म्हणाले.
या अनुभवी प्रशासकाच्या निधनाबद्दल केंदीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही दुःख व्यक्त केले. ‘आम्हाला प्रिय असलेले आर के सचेती यांनी कोव्हिड 19 विरुद्धची लढाई गमविली. ते भारतीय मुष्टियुद्ध क्षेत्राचे मुख्य आधारस्तंभ होते. त्यांच्याच प्रयत्नामुळे भारताचा जागतिक मुष्टियुद्ध क्षेत्रात लौकीक वाढला आहे. ऑलिम्पिकमध्ये आपल्या बॉक्सर्सना खेळताना त्यांना पहायला मिळायला हवे होते. त्यांच्या कुटुंबियावर जो दुखाचा डोंगर कोसळलाय त्यात आम्ही सहभागी आहोत,’ असे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनेही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ‘आयओए असोसिएटचे सहसचिव व बीएफआयचे कार्यकारी संचालक आणि प्रिय मित्र राज कुमार सचेती यांच्या निधनाचे अनपेक्षित वृत्त ऐकून खूप दुःख झाले,’ अशा भावना आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी व्यक्त केल्या. 2016 मध्ये सचेती पहिल्यांदा बीएफआयचे कार्यकारी संचालक बनले आणि या वर्षी अजय सिंग पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवडून येईपर्यंत त्या पदावर ते कार्यरत होते. ‘भारतातील ऑलिम्पिक व राष्ट्रकुल चळवळीत त्यांनी मोठे योगदान दिले असून ते कायम स्मरणात राहणारे आहे,’ असे मेहता म्हणाले. ऑलिम्पिक पात्रतेसाठी नियमावली तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या एक्सपर्ट गुपला सल्ला देण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.