वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाकडून भारतात चारचाकी वाहनांवर बीएस-6 वाहनांची विशेष ओळख अनिवार्य करण्यात येणार आहे. यासाठीचा नवीन नियम येत्या 1 ऑक्टोबर 2020 पासून लागू करण्यात येणार असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
बीएस 6 ची प्रणाली असणाऱया चारचाकी वाहनांची नोंदणी करण्यात आल्यावर सदर वाहनांच्या नंबर प्लेटवर हिरव्या रंगाची पट्टी लावण्यात येणार आहे. यामुळे बीएस- 6 वाहन ओळखणे सोपे होणार आहे. हा नियम पेट्रोल, सीएनजी आणि डिझेल अशा तिन्ही प्रकारच्या चारचाकी वाहनांना लागू होणार आहे. 1 एप्रिल 2020 पासून संपूर्ण देशभरात नवीन इमिशन नॉर्म्स सक्तीचे करण्यात आले आहेत. अशा वाहनांची ओळख व्हावी याकरीता देशामध्ये विशेष चिन्ह लावले जात आहे.
ही बाब लक्षात घेऊनच हा नियम तयार करण्यात आल्याचे रस्ते मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
पट्टीचा आकार निश्वित
सर्व बीएस 6 प्रणालीची सुविधा असणाऱया चारचाकी वाहनांच्या नंबर प्लेटवर 1 सेंटीमीटर चौरस आकाराची पट्टी लावणार आहे. वाहनांच्या इंधनानुसार सदरच्या हिरव्या पट्टीवर आणखीन एक स्टीकर लावणार आहे. पेट्रोल व सीएनजी वाहनांवर निळय़ा रंगाचा स्टिकर, डिझेलच्या वाहनांवर ऑरेंज रंगाचा स्टिकर लावण्यात येणार आहे.