प्रतिनिधी /सातारा :
शहरातील वाढती गुन्हेगारी, चेनस्नेचिंग, कॉलेज परिसरात मुलींची होणारी छेडछाड या गोष्टींना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा ‘बीट मार्शल’ ही संकल्पना कार्यान्वित करण्यात आली आहे.
सातारा शहरात गुन्हेगारी, चेनस्नेचिंग ह्या घटनांना आळा घालता यावे, तसेच एखादी घटना घडल्यास त्वरित पोलिसांना त्या ठिकाणी पोहोचता यावे, यासाठी ही संकल्पना कार्यान्वित करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. याकरिता शहरी भागासाठी चार दुचाकी, एक चारचाकी व हायवे खालील भागासाठी तीन दुचाकी व एक चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या योजनेबाबत पोलीस अधीक्षक सातपुते यांनी सांगितले की, बीट मार्शल हे त्यांना ठरवून दिलेल्या मार्गावर गस्त घालतील व गस्त घालताना ठिकठिकाणी थांबून सायरन बजावतील, लाईट्स लावतील, ज्यामुळे त्या ठिकाणी पोलीस अस्तित्वाची जाणीव नागरिकांना होईल. शहरात विविध ठिकाणी निरीक्षण केले असता, हे बीट मार्शल कोठेही पहावयास मिळाले नाहीत, तसेच एकदाही बीट मार्शलच्या वाहनांचा सायरनचा आवाज आला नाही. शहरात ठिकठिकाणी बार कोड लावण्यात येणार होते. मात्र, त्याचाही अजून पत्ता नाही. बीट मार्शल ही संकल्पना नक्कीच प्रशंसनीय आहे; पण ती योग्यरित्या कार्यान्वित झाली, तरच त्याचा फायदा पोलीस प्रशासन व नागरिकांना होणार आहे.::