नवी दिल्ली
सरकारी पेट्रोलियम कंपनी बीपीसीएलचा (भारत पेट्रोलियम कॉर्प लिमिटेड) चालू आर्थिक वर्षातील जूनअखेरच्या तिमाहीतील निव्वळ नफा दुप्पट नोंदवला गेला आहे. कंपनीचा यंदाचा निव्वळ नफा 2 हजार 076.17 कोटी रुपये नोंदवला गेला असून मागच्या वर्षी याच कालावधीत नफा 1 हजार 075.12 कोटी रुपये होता. कंपनीने साठवणूक केलेल्या कच्च्या तेलातून नफा दुप्पट मिळवल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे इंधन विक्री बऱयापैकी प्रभावीत झाली आहे. इंधन मागणी घटल्याने कंपनीने 75.3 लाख टन इंधनाची विक्री केली आहे. मागच्या वर्षी तिमाहीत कंपनीने 111 लाख टन इंधनाची विक्री केली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इंधन विक्रीवर यंदा मोठा परिणाम जाणवला आहे. पण दुसरीकडे कंपनीच्या एलपीजी विक्रीत मात्र 10 टक्के वाढ दिसून आली. कच्चे तेल व पेट्रोलियम उत्पादनांची मागणी घटल्याने किंमतीवर त्याचा परिणाम दिसतोय.