फीनिक्स मास्टर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित फिनिक्स मास्टर्स लीग टी 20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी बीसीसी मच्छे संघाने विश्रुत स्ट्रायकर्स संघाचा 3 धावांनी तर दुसऱया सामन्यात ऍड. पाटील लायन्स संघाने एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाचा 11 धावानी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. मनोज पाटील (बीसीसी), विशाल गौरगोंडा (ऍडव्होकेट पाटील लायन्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर पहिल्या सामन्यात बीसीसी मच्छेने 20 षटकात 6 बाद 145 धावा केल्या. मनोज पाटीलने 1 षटकार 7 चौकारासह नाबाद 50, अमित पाटीलने 1 षटकार 4 चौकारासह 33, मनोज ताशिलदारने 2 चौकारासह 19, तर प्रसाद नाकाडीने 18 धावा केल्या.
विश्रुत स्ट्रायकर्सतर्फे रब्बानी दफेदारने 16 धावात 2 तर ताहिर सराफ, नरेंद्र मांगुरे व प्रमोद पालेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल विश्रुत स्ट्रायकर्स संघाने 17 षटकात 6 बाद 120 धावा केल्या होत्या. यावेळी पावसाने हजेरी लावल्याने धावांच्या सरासरीवर बीसीसी मच्छे संघाला विजयी घोषित करण्यात आले. विश्रुततर्फे राहुल शिंदेने 3 षटकार 1 चौकारासह नाबाद 41, प्रमोद पालेकरने 1 षटकार 4 चौकारांसह 30 तर नरेंद्र मांगुरेने दोन चौकारासह 26 धावा केल्या. मच्छेतर्फे संदीप चव्हाणने 14 धावात 2, प्रसाद नाकाडीने 24 धावात 2, मनोज ताशिलदार व मनोज पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात ऍड. पाटील लायन्सने 10 षटकात 8 बाद 76 धावा केल्या. सुनिल पाटीलने 1 षटकार 3 चौकारासह 25, शिवाजी पाटीलने 2 चौकारासह 16, तर विनायक सिद्दलिंगने 13 धावा केल्या. एक्स्ट्रिम स्पोर्स्ट्सने बसवराज हम्मण्णावरने 12 धावात 2 तर पंकज पवार, मिलिंद बेळगावकर, सागर अंगडी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एक्स्ट्रिम स्पोट्स संघाने 10 षटकात 5 गडी बाद 65 धावा केल्या. त्यात सागर गौरगोंडाने 6 चौकारासह 44 धावा केल्या. ऍडव्होकेटतर्फे विशाल गौरगोंडाने 7 धावात 2, सुनिल सक्रीने 13 धावात 2, शिवाजी पाटीलने 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे स्पर्धा पुरस्कर्ते हर्ष जॉन थॉमस, विवेक देसाई, हर्मितसिंग यांच्या हस्ते सामनावीर व उत्कृष्ट झेल मनोज पाटील, इम्पॅक्ट खेळाडू व सर्वाधिक षटकार राहुल शिंदे यांना तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे सुशांत चव्हाण, शाम उडेकर, मिलिंद चव्हाण यांच्या हस्ते सामनावीर विशाल गौरगोंडा, इम्पॅक्ट खेळाडूत सुनील पाटील, सर्वाधिक षटकार विनायक सिदलिंग, उत्कृष्ट झेल विरेश गौडर यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
बुधवारचे सामने
- के. आर. शेट्टी किंग्स वि. फॅन्को क्लब सकाळी 9 वाजता,
- बीसीसी मच्छे वि. एक्स्ट्रिम स्पोर्ट्स दुपारी 1 वाजता.