वृत्तसंस्था/ लंडन
नॉर्वेचा विश्वविजेता बुद्धिबळपटू मॅग्नग्नस कार्लसनने भरघोस बक्षीस रकमेच्या तीन स्पर्धा ऑनलाईन घेण्याची घोषणा ट्विटरद्वारे केली आहे. या तीन स्पर्धांसाठी सहा लाख डॉलर्स बक्षीस रक्कम असणार आहे. विशेष म्हणजे, या महिन्यात फिडेने ऑनलाईन नेशन्स कप स्पर्धेचे आयोजन केले होते. यानंतर लगेचच फिडेला आव्हान देत त्याने या तीन स्पर्धांची घोषणा केली आहे.
काही दिवसांपूर्वीच कार्लसनने आपल्याच नावाने चेस ट्वेंटी फोर डॉट कॉम या संकेतस्थळासोबत कार्लसन इन्विटेशनल इंटरनॅशनल स्पर्धा आयोजित केली होती आणि त्यानेच या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. या स्पर्धेत दोन लाख 50 हजार डॉलर्सची बक्षिसे होती. यानंतर, 19 मे ते 3 जून दरम्यान कार्लसन व आघाडीच्या इतर खेळाडूंदरम्यान लिंडोरेस ऍबी रॅपिड चॅलेंज स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठीही दीड लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
ऑगस्टपर्यंत चार स्पर्धांचे आयोजन
विशेष म्हणजे, गत महिन्यात दोन स्पर्धानंतर कार्लसनने आणखी काही ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार 20 जून ते 5 जुलैदरम्यान ऑनलाईन चेस मास्टर्स स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी दीड लाख डॉलर्सचे बक्षीस आहे. तसेच लिजेंड्स ऑफ चेस स्पर्धा 21 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी दीड लाख डॉलर्सचे बक्षीस आहे. या दोन स्पर्धानंतर ग्रँड फायनल स्पर्धा 9 ते 20 ऑगस्टदरम्यान होईल. ग्रँड फायनलसाठी 3 लाख डॉलर्सची बक्षीस रक्कम असल्याचे कार्लसनने स्पष्ट केले आहे. या सर्व स्पर्धा ऑनलाईन होणार आहेत. या प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या चार खेळाडूंना पुढच्या स्पर्धेत स्थान मिळणार आहे. विशेष म्हणजे, या सर्व महत्वपूर्ण स्पर्धांत जगभरातील नामांकित खेळाडूंचा समावेश असेल.
जागतिक बुद्धिबळासाठी चांगले दिवस
जगभरात धुमाकुळ घातलेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग ठप्प असून क्रीडा विश्वाला याचा मोठा फटका बसला आहे. सध्याच्या घडीला या ऑनलाईन विश्वात बुद्धिबळाने चांगलीच बाजी मारली आहे. फिडेने मे महिन्यात नेशन्स कप स्पर्धेचे आयोजन केले होते. यानंतर, जागतिक ख्यातीचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने तीन मोठय़ा स्पर्धांचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे, जागतिक दर्जाच्या स्पर्धांचे अधिकृत हक्क फिडेकडे कायम आहेत. पण अशा भरघोस बक्षीस रकमेच्या व प्रसिद्धी मिळवणाऱया खासगी स्पर्धा होत असतील तर यात वावगे काहीच नाही.