उपग्रहीय छायाचित्रांमध्ये दिसल्या 200 हून अधिक दफनभूमी
युक्रेनविरोधी युद्धात पुतीन हे लवकरात लवकरच विजय मिळवू पाहत आहेत. रशियाचा मारियुपोलवरील कब्जा त्याचा विजयच मानला जाणार असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर युक्रेनकडून सातत्याने मारियुपोलमध्ये अडकून पडलेल्या लाखो लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याचदरम्यान मारियुपोलची काही उपग्रहीय छायाचित्रे समोर आली आहेत. ही छायाचित्रे सामूहिक दफनभूमींची आहेत. येथे 200 हून अधिक कब्र असल्याचा दावा करण्यात आला आहे. मृतदेहांना त्यात दफन करण्यात आले आहे किंवा दफन करण्याची तयारी सुरू असल्याचा दावा आहे.
रशियाच्या सैन्यावर सर्वसामान्य नागरिकांची कत्तल करण्याचा आरोप पहिल्यांदा झालेला नाही. यापूर्वी रशियन सैनिकांनी बूचामध्ये देखील मोठा नरसंहार केला होता. तेव्हा त्या घटनेवरून रशियावर टीकेची झोड उठली होती तसेच संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेतून त्याची हकालपट्टी करण्यात आली होती.
युक्रेनच्या नेक्स्टा या प्रसारमाध्यमाने ही छायाचित्रे प्रसारित कत मारियुपोलपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या स्टारी क्रिम गावात ही सामूहिक कब्र आहे. या कब्रांमध्ये निर्दोष लोकांना ठार करून रशियन सैनिक दफन करत आहेत.
मारियुपोलमध्ये रशियाकडून झालेल्या बॉम्बवर्षावामुळे 20 हजार लोक मारले गेले आहेत, यात महिला, मुले आणि वृद्धांचा समावेश आहे. या मृतदेहांना आता गायब करण्यात आले आहे. अद्याप एक लाख लोक मारियुपोलमध्ये असल्याचा युक्रेनचा अनुमान आहे.