बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांनी कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरातील प्रतिबंधात्मक आदेश १४ जूनपर्यंत वाढवला असल्याचे सांगितले. कोरोना पॉझिटिव्हिटी प्रकरणे आणि मृत्यूचे प्रमाण अजूनही जास्त असल्याने सरकारच्या आदेशानुसार १४ जून रोजी सकाळी ६ पर्यंत मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
पंत यांच्या आदेशानुसार, सार्वजनिक ठिकाणी चारपेक्षा जास्त लोकांच्या संमेलनास प्रतिबंध केला जाईल, असे म्हंटले आहे. बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळ या निर्बंधापासून वगळलेले आहेत, असे आदेशात म्हटले आहे.
उपरोक्त निर्देशांचे कोणतेही उल्लंघन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ आणि कर्नाटक साथीच्या रोग अधिनियमांतर्गत खटला भरण्यासाठी जबाबदार असेल, असे या आदेशात म्हटले आहे.