बेंगळूर/प्रतिनिधी
दक्षिण कन्नड जिल्हा पोलिसांनी तुळू चित्रपट अभिनेता सुरेंद्र बंटवाल यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक केली. सतीश आणि गिरीश अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांना कर्नाटक-केरळ सीमेजवळील जागेवरून अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
२१ सप्टेंबर रोजी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंटवाळ शहरात त्याच्या अपार्टमेंटमध्ये सुरेंद्र बंटवाळ यांना चाकूने वार करून ठार मारण्यात आले. त्याचा मृतदेह एका सोफ्यावर पडला होता. त्यांच्या शरीरावर चाकूने अनेक वार केले होते.
सुरेंद्र बंटवाळ यांना २०१८ मध्ये तलवार चालविणे व बंटवाळमधील भाजप कार्यकर्त्यांना धमकावल्याप्रकरणी अटक केली होती. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. त्याच्यावर सुमारे १५ फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरुवातीला तो दक्षिणपंथी संघटनांमध्ये होता आणि नंतर तो कॉंग्रेसमध्ये दाखल झाला.