बेंगळूर/प्रतिनिधी
बृह बेंगळूर महानगर पालिकेने (बीबीएमपी) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी बालरोग तज्ञांचा समावेश असलेल्या १४ सदस्यांचे पॅनेल गठित केले आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे तज्ज्ञांनी म्हंटले होते. याची दखल घेत हा निर्णय घेतला आहे.
बीबीएमपीचे मुख्य आयुक्त गौरव गुप्ता यांनी एका आदेशात म्हंटले आहे की समितीत पाच विशेषज्ञांचा समावेश असेल. यामध्ये इंदिरा गांधी बाल आरोग्य संस्थेचे संचालक डॉ. संजय, डॉ. मल्लिकार्जुन, भारतीय बाल रोगशास्त्र अकादमीचे अध्यक्ष, इंद्रधनुष्य मुलांच्या रुग्णालयाचे प्रमुख बाल रोग विशेषज्ञ डॉ. रक्षा शेट्टी, मनिपाल रुग्णालयाचे डॉ नरेश पी. आणि कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे डॉ. विश्वनाथ कामोजी यांचा समावेश असेल, असे म्हंटले आहे.
आयुक्त गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे अन्य नऊ सदस्य नागरी अधिकारी आहेत. विशेष सचिव (आरोग्य) डी. रणदीप हे सदस्य सचिव असतील. मुख्य आरोग्य अधिकारी (सार्वजनिक आरोग्य) बी. विजयेंद्र, मुख्य आरोग्य अधिकारी (क्लिनिकल) निर्मला बुग्गी, आणि बीबीएमपीमध्ये काम करणारे इतर मुलांचे विशेषज्ञही समितीवर असतील.