बेंगळूर/प्रतिनिधी
बीबीएमपी रुग्णालयातून नवजात मुलाचे अपहरण करण्यामागील रहस्य अखेरीस बेंगळूर पोलिसांनी उलगडले. याप्रकरणी पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे. दरम्यान, अर्भक चोरी केल्याप्रकरणी बेंगळूर दक्षिण पोलिसांनी डॉ. रश्मी शशिकुमार यांना अटक केली आहे. त्यांनी १४.५ लाख रुपये घेऊन त्या बालकाला विकले होते. डॉ. रश्मी शशिकुमार या एका खासगी रूग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रश्मी शशिकुमार यांनी चामराजपेट येथील बृह बेंगळूर महानगरपालिकेच्या (बीबीएमपी) रुग्णालयात प्रसूतीगृहातून एका बालकाचे अपहरण केल्याचा आरोप आहे. उत्तर कर्नाटकातील एका जोडप्याबरोबर संबंधित मुद्द्यांकरिता सल्लामसलत केली होती.
डॉ. रश्मीने या जोडप्याकडून १४.५ लाख रुपये घेतले होते आणि त्यांना २०२० च्या मे महिन्यात सरोगसीने बाळ देण्याचे आश्वासन दिले होते. याविषयी बोलताना दक्षिण विभागाचे पोलीस उपायुक्त हरीश पांडे म्हणाले, “प्राथमिक तपासणीनुसार, गेल्या मे महिन्यात बाळाचे अपहरण बीबीएमपी हॉस्पिटलमधून झाले होते, चोरीला गेलेले अर्भक हे हुस्ना बानो आणि तिचा नवरा नवीन यांचे होते, त्यांनी आमच्याकडे येऊन तक्रार दिली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आम्ही २० जणांसह एक टीम तयार केली होती, ” अशी माहिती दिली आहे.