बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरमधील कोविड -१९ रुग्णांच्या वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता दूर करण्याच्या उद्देशाने कॅनेडियन इंटरनॅशनल स्कूल बेंगळूरने (सीआयएसबी) गुरुवारी जाहीर केले की ते या शाळेच्या वसतिगृहाला १२० बेडच्या ऑक्सिजन सेंटरमध्ये रुपांतर करेल. या ठिकाणी अशा रुग्णांवर उपचार केले जातील ज्यांना गंभीर वैद्यकीय सेवेची गरज नाही परंतु त्यांना ऑक्सिजनची तीव्र गरज आहे.
सीआयएसबी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही सुविधा उद्योजक संघटना (ईओ) बेंगळूर यांच्या संयुक्तविद्यमाने दिली जाईल. ईओ हे ६० हून अधिक देशांमधील १४ हजारापेक्षा अधिक समविचारी उद्योजकांचे नेटवर्क आहे.
प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सध्याची मागणी पूर्ण करण्यासाठी शाळा “कमीतकमी वेळेत” सुमारे ५० बेड्स सुसज्ज करण्याचा विचार करीत असल्याचे सीआयएसबी अधिकाऱ्यांनी सांगितले. खर्चाचा विचार करता “दुसऱ्या टप्प्यात ही पायाभूत सुविधा १२० बेडपर्यंत वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या खर्चास पाठिंबा देण्याची योजना आहे. प्रत्येक ऑक्सिजन बेडची किंमत १ लाख रुपये असेल आणि त्यामुळे सीओआयएसबीच्या ऑक्सिजन बेडसाठी १ कोटी रुपये जमा करण्याची योजना ईओची आहे, ”असे एका निवेदनात म्हटले आहे.