हजारो भाविकांची उपस्थिती : महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता
प्रतिनिधी /बेळगाव
बेकिनकेरे येथील नागनाथ मंदिराचा चौथा वर्धापन दिन शनिवारी उत्साहात पार पडला. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. विद्युत रोषणाई करून मंदिर सजविण्यात आले होते. त्यामुळे गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासून भाविकांची मंदिर परिसरात दर्शनासाठी वर्दळ वाढली होती. शनिवारी पहाटे मंदिरात देवस्थान कमिटीचे सदस्य बळवंत सावंत, परशराम भातकांडे व पुंडलिक सावंत यांच्या हस्ते होमपूजन, शिवलिंग पूजन आणि अभिषेक झाला.
यावेळी गावातील माजी सैनिक, निवृत्त शिक्षक, टेलिफोन आणि रेल्वेखात्यातून निवृत्त झालेल्यांचा सत्कार पार पडला. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मंदिर आवारात उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात ज्योतिर्लिंग आणि ज्ञानेश्वर भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम झाला. या निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठय़ा प्रमाणात भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाआरतीने या दोनदिवसीय कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष देवाप्पा भोगण, सदस्य आनंद धायगोंडे, परशराम भातकांडे, लक्ष्मण गडगाणे, चंद्रकांत भोगण, यल्लाप्पा गावडे, खजिनदार मल्लाप्पा गावडे, सुरेश सावंत, बळवंत सावंत, भावकू सावंत, आनंद धायगोंडे, पुंडलिक सावंत, पुंडलिक भडांगे, बाळू यळ्ळूरकर, सुधाकर बिर्जे, अंबाजी सावंत, गंगाराम सावंत, संजय पाटील, डॉ. विवेक सावंत, नामदेव भोगण, मल्लाप्पा महागावकर यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.