84 वर्षीय वृद्धाला बँकेत बंद करून गेले कर्मचारी, 18 तासानंतर पोलिसांनी येत वाचविला जीव
हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये युनियन बँकेच्या कर्मचाऱयांच्या घोर निष्काळजीपणा समोर आला आहे. कर्मचाऱयांच्या निष्काळजीपणामुळे 84 वर्षीय वृद्धाच्या जीवावर बेतण्याची वेळ आली होती. बँक कर्मचारी वृद्धाला लॉकर रुममध्ये बंद करून घरी निघून गेले. सुमारे 18 तासांपर्यंत तेथे बंद राहिल्यावर दुसऱया दिवशी सकाळी पोलिसांनी बँक उघडवून त्यांना वाचविले आहे. तोपर्यंत वृद्धाची प्रकृती बिघडली होती. हा वृद्ध मधुमेहाने ग्रस्त असून पूर्ण रात्र काहीच न खाल्ल्याने बेशुद्ध झाला होता.
उद्योजक व्ही. किशन रेड्डी हैदराबादच्या जुबली हिल्स भागात राहतात. सोमवारी संध्याकाळी 4.20 वाजता ते युनियन बँकेच्या शाखेत गेले होते. रेड्डी यांना स्वतःचा लॉकर ऑपरेट करायचा होता. बँक कर्मचाऱयाने त्यांना लॉकर रुममध्ये नेले, तेथे मास्टर कीद्वारे लॉकर खोलल्यावर रेड्डी यांना तेथेच सोडून कर्मचारी बाहेर आला. त्यानंतर सर्व कर्मचारी 5.30 वाजता बँकेला टाळे लावून घरी गेले, परंतु लॉकररुममधून रेड्डी बाहेर आले आहेत की नाही याची खातरजमा कुणीच केली नाही.
रात्री उशिरापर्यंत रेड्डी घरी न परतल्याने कुटुंबीयांना चिंता होऊ लागली. त्यांनी आपण कुठे जातोय हे कुटुंबीयांना सांगितले नव्हते तसेच स्वतःचा मोबाइलही सोबत घेतला नव्हता. कुटुंबीयांनी बराच वेळ शोध घेतल्यावर पोलिसांकडे हरवल्याची तक्रार केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असता एकात रेड्डी युनियन बँकेनजीक दिसले. फुटेजमध्ये ते बँकेत शिरताना दिसले परंतु बाहेर पडताना दिसून आले नाहीत. यामुळे रेड्डी बँकेतच राहिले असावेत असा संशय पोलिसांना वाटला.
त्यानंतर सकाळी 10.30 वाजता बँक सुरू झाल्यावर पोलिसांनी आत जाऊन शोध घेतला असता लॉकर रुममध्ये रेड्डी दिसून आले. त्यांची प्रकृती बरी नसल्याने पोलिसांनी त्यांना रुग्णालयात हलविले. रेड्डी यांच्या कुटुंबीयांनी बँकेविरोधात निष्काळजीपणाची तक्रार नोंदविल्यास कारवाई करू असे पोलिसांनी म्हटले आहे.