1 तास 20 मिनिटे रंगला सामना
वार्ताहर /कोगनोळी
बेनाडी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानामध्ये पुणे येथील सुनील फडतरे यांनी कुर्डूवाडीच्या दादासो मुल्लाणी याला दुहेरी पटावर चितपट करुन आसमान दाखविले. 1 तास 20 मिनिटे चाललेल्या कुस्तीमध्ये विजेत्या फडतरेला रोख रक्कम व कायमस्वरुपी चांदीची गदा बक्षिस देण्यात आली. सयाजी कोळेकर (कोल्हापूर) व लिंगराज होनमाने (कोल्हापूर) यांच्यातील दुसऱया क्रमांकाची कुस्ती लक्षवेधी ठरली. अवघ्या 10 मिनिटात होनमानेनी कोळेकरला घुटना डावावर चितपट केले. अरुण बोंगार्डे व आसिफ मुल्लाणी यांच्यात तृतीय क्रमांकाची कुस्ती झाली. मुल्लाणी जखमी झाल्याने बोंगार्डेला विजेता घोषित केले. होनमाने व बोंगार्डेला रोख रक्कम व चांदीचे कडे बक्षीस देण्यात आले. अमोल भगव (कोल्हापूर) व शुभम कोळेकर (कोल्हापूर) यांच्यात झालेल्या चौथ्या क्रमांकाच्या लढतीत अमोलने सवारी डावावर शुभमवर मात केली. येथील शर्यत माळावरील जय हनुमान आनंद कुस्ती आखाडय़ात 60 हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या.
उद्योजक महादेव पाटील (पुणे), कुमार पाटील (पुणे) यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मैदान पूजन व कुस्ती मैदानाचे उदघाटन झाले. मोहन पाटील, शंकर घाटवटे, शिवाजी जमनिक यांनी पंच म्हणून काम पाहिले. विजेत्या मल्लांना किरण पाटील, विठ्ठल गुरव, आण्णासाहेब घाटवडे, चन्नाप्पा पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी यात्रा कमिटीचे पदाधिकारी व कुस्ती मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कृष्णात चौगुले (राशिवडे) यांनी निवेदन केले. हनुमंत घुले (कसबा सांगाव) यांनी हलगी वादन केले.