प्रतिनिधी / नागठाणे :
तीन दिवसांपूर्वी वेणेगाव (ता.सातारा) येथून बेपत्ता झालेल्या वयोवृद्धाचा मृतदेह सोमवारी सायंकाळी येथीलच कृष्णा नदीपात्रात आढळून आला. जयसिंग लक्ष्मण सावंत (वय.८५)असे मृत वयोवृद्धाचे नाव आहे. बोरगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री जेवण करून सावंत कुटुंबीय झोपी गेले होते. शनिवारी सकाळी मुलगा बाळकृष्ण सावंत यांना वडील जयसिंग सावंत घरात आढळून आले नाहीत. जयसिंग सावंत यांचे डोक्यावर साधारण परिणाम झाला असल्याने कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, ते आढळून न आल्याने शनिवारी ते बेपत्ता झाल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दिली. सोमवारी सायंकाळी गावानजीकच असलेल्या कृष्णा नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.