प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बेळगावची विमानसेवा ठप्प आहे. केंद्रीय विमान उड्डाणमंत्री हरदिपसिंग पुरी यांनी बुधवारी देशांतर्गत विमानसेवेला हिरवा झेंडा दाखविला. 25 मेपासून विमान सेवा सुरू करा, असे आदेश त्यांनी दिले असले तरी अद्याप बेळगाव सांबरा विमानतळाला तसे स्पष्ट आदेश मिळालेले नाहीत. बेळगावचे विमानतळ उड्डाणासाठी सज्ज झाले असून आदेश येताच सेवा सुरू करण्यात येणार आहे.
कोरानाचा धोका वाढू लागताच देशातील विमानतळांचे शटडाऊन करण्यात आले. इमर्जन्सी वगळता इतर सर्व विमान उड्डाणे विमान प्राधिकरणाने रद्द केली होती. चौथे लॉकडाऊन सुरू झाले तरी अद्याप देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे विमानसेवा नेमकी केव्हा सुरू होणार, याबाबत प्रवासी साशंक होते.
बुधवारी केंदीय विमान उड्डाणमंत्री हरदिपसिंग पुरी यांनी ट्विट करून 25 मे पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे विमानसेवेसाठी हिरवा कंदील मिळाला असून प्रत्येक विमानतळाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्राधिकरणाचा आदेश व संबंधित कंपन्यांना होकार मिळताच पुन्हा विमान आकाशात झेपावणार आहे.
पहिल्या टप्प्यात मोठय़ा शहरांची सेवा सुरू होण्याची शक्मयता
राजेशकुमार मौर्य (संचालक, बेळगाव विमानतळ)
केंद्रीय प्राधिकरणाकडून अद्याप विमानसेवा सुरू करण्याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आलेले नाहीत. पहिल्या टप्प्यात मोठय़ा शहरांची सेवा सुरू होण्याची शक्मयता आहे. बेळगाव विमानतळ उड्डाणासाठी सज्ज असून सर्व त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग आदी व्यवस्था करण्यात आली आहे. प्राधिकरणाने आदेश देताच विमानसेवा सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.