हॉकीच्या धर्तीवर फुटबॉल स्टेडियमला जागा देण्याची जिल्हा संघटनेची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
हॉकी ऍस्ट्रोटर्फ स्टेडियमप्रमाणे फुटबॉल स्टेडियमसाठीही जागा द्यावी, जेणेकरुन बेळगावातील फुटबॉलला नवसंजीवनी लाभेल, अशी मागणी बेळगाव जिल्हा फुटबॉल फेडरेशनने बुडाकडे केली. हॉकी स्टेडियमसाठी अलीकडेच बुडाने 8 एकर जागा मंजूर केली, त्याचे बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेने येथे स्वागत केले.
बेळगावला हॉकीप्रमाणेच फुटबॉलची देखील मोठी परंपरा आहे. शालेय स्तरापासून खुल्या गटापर्यंत विविध वयोगटातील स्पर्धा शहर परिसरात होतात. 14 वर्षाखालील, 17 वर्षाखालील मुले-मुली, महाविद्यालयीन स्तर व खुल्या गटातून होणाऱया स्पर्धा हा नेहमीच आकर्षण बिंदू असतो. कर्नाटक राज्य संघटनेची मान्यता असलेल्या आपल्या जिल्हा संघटनेत 20 संलग्न क्लब सदस्य आहेत. या सर्व स्पर्धांच्या माध्यमातून किमान 1 हजार खेळाडू फुटबॉलमधील आपली प्रतिभा दर्शवतात. पण, सध्याच्या घडीला बेळगावात फुटबॉलसाठी फक्त सुभाषचंद्र बोस मैदानचा (लेले ग्राऊंड) एकमेव पर्याय उपलब्ध आहे, याकडे बेळगाव जिल्हा संघटनेने यावेळी लक्ष वेधले.
2017 मध्ये धारवाड येथे कर्नाटक राज्य आयोजित मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत बेळगाव जिल्हा फुटबॉल संघ विजेता ठरला. त्यानंतर 2018 मध्ये दसरा महोत्सवांतर्गत आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेत बेळगाव संघाने उपजेतेपदावर आपली मोहोर उमटवली होती. बेळगावातील खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे आणि योग्य व्यासपीठ, मैदान लाभले तर त्यांची प्रतिभा आणखी उजळू शकेल. या अनुषंगाने फुटबॉल स्टेडियमसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, असे बेळगाव जिल्हा संघटनेने पत्रकातून नमूद केले.
कोटस
दक्षिण मतदारसंघात येणाऱया असंख्य प्रशाला व महाविद्यालयीन फुटबॉलपटूंसाठी लेले ग्राऊंडचा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. मध्यवर्ती ठिकाणी फुटबॉल स्टेडियम उभारता आले तर येळ्ळूर, मजगाव, वडगाव, टिळकवाडी व आसपासच्या सर्व परिसरातील युवा खेळाडूंना उत्तम सुसंधी लाभू शकते. फुटबॉलसाठी सुसज्ज मैदान उभारले जाणे बेळगावच्या फुटबॉल इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी पाऊल ठरेल.