परराज्यातून आलेल्यांनाच कोरोनाची लागण, बेळगावचा आकडा 331 वर, मंगळवारी तिघे जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाची बाधा किती जणांना झाली याकडे आता साऱयांचेच लक्ष लागून राहिले आहे. मंगळवारी पुन्हा बेळगाव जिह्यात परराज्यातून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्रातून आलेल्या 32 वषीय पुरुष तसेच 25 वषीय महिलेला ही बाधा झाली आहे. महत्वाचे म्हणजे पुरुष कोणाच्याच संपर्कात न येता त्याला लागण झाल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. जिह्याचा आकडा 331 वर पोहोचला. मात्र आतापर्यंत 306 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे थोडी खुशी थोडा गम म्हणण्याची वेळ बेळगावकरांवर आली आहे.
परराज्यातून आलेल्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांचे स्वॅबही घेतले जात आहेत. त्यामधील काही जण पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे परराज्यातून आलेल्या व्यक्तींबद्दल जनतेच्या मनात भितीच निर्माण होत आहे. महाराष्ट्रातून आलेल्या दोघांना लागण झाल्याचा अहवाल आला आहे. राज्यातही मंगळवारी तब्बल 947 कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 15 हजारांवर पोहोचला आहे.
लॉकडाऊनची भिती पुन्हा वाढु लागली आहे. रुग्ण असेच वाढत राहिल्यास पुन्हा लॉकडाऊन होणार असे बोलले जात आहे. सर्व दक्षता घेवून देखील कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे भितीचे वातावरण पसरु लागले आहे.