दररोज लाखो रुपयांचा फटका, लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प झाल्याने विक्रीवर परिणाम
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यासह जिल्हय़ात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मागील महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे वाहनांची ये-जा कमी झाल्याने बेळगावमधील पेट्रोल-डिझेलची विक्री 85 टक्मक्मयांनी कमी झाली आहे. शहरात काही प्रमाणात ग्राहक असले तरी ग्रामीण भागात मात्र पेट्रोलपंपांवर बसून राहण्याची वेळ कामगारांवर येत आहे.
एप्रिल महिन्याच्या अखेरपासून लॉकडाऊन करण्यास सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून नागरिकांचे बाहेर पडणे बंद झाले. महामार्गावरून होणारी अवजड वाहनांचीही गती मंदावली. यामुळे पेट्रोल व डिझेलच्या मागणीत घट होत गेली. लॉकडाऊनच्या कालावधीत पेट्रोलपंप सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असली तरी ग्राहक नसल्याने बसून राहण्याची वेळ कामगारांवर येत आहे.
आठवडय़ाला केवळ 2 टँकर
देसूर येथे दोन पेट्रोल-डिझेल कंपन्यांचे डेपो आहेत तर एक हुबळी येथे आहे. तेथून इंधनाची वाहतूक जिल्हय़ात केली जाते. परंतु सध्या मागणी कमी असल्याने इंधन पुरवठा करणारे टँकरदेखील डेपोमध्येच उभे आहेत. यामुळे कंपन्यांही मोठा तोटा सहन करावा लागत आहे. ज्या पेट्रोलपंपांवर इंधनाची खरेदी जास्त आहे, अशा ठिकाणी दररोज एक टँकर पेट्रोल लागत होते. परंतु सध्या आठवडय़ाला 2 टँकर मागविण्याची वेळ आली आहे. त्यातच पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडलेले असल्याने इंधनाची मागणी काहीशी कमी होत आहे.
केवळ 10 टक्के इंधन विक्री
लॉकडाऊनपासून पेट्रोल व डिझेलची मागणी कमालीची कमी झाली आहे. काही पेट्रोलपंपांवर तर केवळ 10 टक्केच इंधनाची विक्री होत आहे. यामुळे मोठा तोटा पंपचालकांना सोसावा लागत आहे. तसेच ग्राहकच नसल्याने कामगारांना कामावर बोलावण्याचा प्रश्नही निर्माण होत आहे.
– प्रशांत मेलगे (पेट्रोलपंप ओनर्स असोसिएशन सदस्य)