30 एप्रिलपासून कार्यान्वित झालेल्या हेल्पलाईनवर आतापर्यंत 600 हून अधिक कॉल्स : 80 टक्के रुग्णांना घरीच उपचार घेणे पसंत
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे नागरिक आता आपल्या आरोग्याबद्दल अधिक दक्ष झाले आहेत. त्यामुळे अत्यंत किरकोळ अशा शारीरिक तक्रारीपासून गंभीर आजाराबाबत डॉक्टरांना विचारणा करणे, त्यांच्याशी संपर्क करणे याचे प्रमाण वाढले आहे. या अनुषंगाने बेळगावच्या डॉक्टरांनी आयएमएच्या सहकार्याने सुरू केलेल्या हेल्पलाईनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 30 एप्रिलपासून कार्यान्वित झालेल्या या हेल्पलाईनवर आजपर्यंत 600 हून अधिक कॉल्स आले आहेत.
बेळगावच्या मधुमेहतज्ञ डॉ. नीता देशपांडे यांनी या हेल्पलाईनसाठी पुढाकार घेतला. त्यांना आयएमए बेळगाव शाखेचे सहकार्य लाभले. या अंतर्गत एकूण 9 डॉक्टर एकत्र आले आहेत. त्यांनी आपापल्या वेळा ठरवून घेतल्या असून, त्यानुसार प्रत्येकजण रुग्णांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करत आहेत.
ही हेल्पलाईन सुरू करण्यापूर्वी डॉ. नीता देशपांडे आणि डॉ. गुरुराज उडचणकर यांनी झूमवरून हेल्पलाईनची कार्यवाही कशी असावी, ती कशी कार्यान्वित करावी याबाबत बरीच चर्चा केली. त्यानंतर अन्य डॉक्टरांशी संपर्क साधला गेला. मुख्य म्हणजे त्यांनी एक सॉफ्टवेअर विकसित केले असून, रुग्णांचा सर्व तपशील संकलित केला जातो. एखाद्या रुग्णाला ब्लड टेस्ट सांगितली असल्यास त्याने पाठविलेला रिपोर्ट अपलोड केला जातो. जेणेकरून सर्व डॉक्टरांना त्याची माहिती होऊ शकते व त्यानुसार त्या-त्या रोगाशी संबंधित तज्ञ डॉक्टर रुग्णांना मार्गदर्शन करू शकतात.
यामध्ये डॉ. नीता देशपांडे (मधुमेहतज्ञ), डॉ. गुरुराज उडचणकर (चेस्ट फिजिशियन), डॉ. आसावरी संत (पॅथॉलॉजिस्ट), डॉ. राजश्री अनगोळ (बालरोगतज्ञ), डॉ. रवी अनगोळ (फिजिशियन), डॉ. प्रभुराज बाली, डॉ. सविता कद्दू, डॉ. अनिता उमदी (गायनाकॉलॉजिस्ट), डॉ. सूरज जोशी (ईएनटी) या डॉक्टरांचा सहभाग आहे.
हेल्पलाईनबाबत बोलताना डॉ. नीता देशपांडे म्हणाल्या, 80 टक्के लोक हॉस्पिटलला जाण्याऐवजी घरीच उपचार घेणे पसंत करतात. हेल्पलाईनचा अशा सर्व लोकांना फायदा झाला आहे. दररोज साधारण 25 ते 30 फोन हेल्पलाईनला येतात. 30 एप्रिल ते 18 मेपर्यंत साधारण 600 हून अधिक कॉल आले आहेत.
महिलांच्या शंकांचे निरसन
महत्त्वाचे म्हणजे अनेक महिलांना बराच संभ्रम पडलेला दिसतो. गर्भवतीने लस घ्यावी की न घ्यावी, गर्भवतीला कोरोना झाल्यास गर्भाला संसर्ग होऊ शकतो का? कोरोनाग्रस्त प्रसूत महिला दुग्धपान करू शकते की नाही? याबाबत माहिती विचारली जाते. याशिवाय लसीबाबतचे प्रश्न येतात. कोरोना चाचणीबाबत कोणत्या चाचण्या कराव्यात, चाचणी कधी करावी, याचीही विचारणा केली जाते. सर्व प्रश्नांना संबंधित डॉक्टर उत्तरे देऊन सल्ला देत आहेत.
सदर हेल्पलाईन जनकल्याण ट्रस्टशी संलग्न असून, रुग्णांना आयसोलेशन सेंटरची किंवा हॉस्पिटलची आवश्यकता भासल्यास ट्रस्टला माहिती दिली जाते. सदर ट्रस्टने आरपीडी कॉर्नर येथे उमा केशव व संत मीरा स्कूल या ठिकाणी आयसोलेशन सेंटर सुरू केली आहेत.
सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत हेल्पलाईन सुरू
या हेल्पलाईनचा क्रमांक-8779181891 असा आहे. सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत सर्व दिवस ही हेल्पलाईन सुरू आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्येसुद्धा आयएमएने हेल्पलाईन सुरू केली होती. दुसरी लाट तीव्र झाल्याने पुन्हा ही हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे.