कर्नाटक राज्य आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा
प्रतिनिधी/ बेळगाव
गुलबर्गा जिल्हय़ातील कलबुर्गी येथे कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या मान्यतेने सुरू असलेल्या आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेत बेळगाव संघाने बळ्ळारी संघाचा 3 -1 तर दुसऱया सामन्यात विजापूर संघाचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
गुलबर्गा जि. कलबुर्गी येथील जिल्हा क्रीडांगणावर आयोजित केलेल्या 22 वर्षाखालील आंतरजिल्हा स्पर्धेतील पहिला सामना बळ्ळारी संघाबरोबर झाला. बेळगाव जिल्हा संघाने प्रारंभापासूनच आक्रमक खेळ करीत 8 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला. किरण जोगानीच्या पासवर वृशासन देसाईने हा गोल नोंदवला. 30 व्या मिनिटाला बेळगाव जिल्हय़ाच्या तुषार पवारच्या पासवर किरण जोगानीने गोल नोंदवून संघाला 2-0 अशी आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱया सत्रात 40 व्या मिनिटाला बळ्ळारीच्या शिवप्पाने गोल करून बेळगावची आघाडी 1-2 अशी कमी केली. 51 व्या मिनिटाला श्रीहरी उगाडेच्या पासवर जयस सांबरेकरने तिसरा गोल करून बेळगाव संघाला 3- 1 अशी आघाडी मिळवून दिली.
दुपारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने विजापूर संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 22 व्या मिनिटाला बेळगाव जिल्हा संघाच्या तुषार पवारच्या पासवर किसन पाटीलने गोल करून आघाडी मिळवून दिली. या सत्रात विजापूरने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु बेळगाव संघाच्या बाचावफळीने त्यांचे प्रयत्न असफल केले. दुसऱया सत्रात 44 व्या मिनिटाला ऋषभ देसाईच्या पासवर शिवकांत खानापुरेने बेळगाव संघाचा दुसरा गोल नोंदवला. बेळगाव जिल्हा संघाने पहिल्या दिवशी दोन्ही साखळी सामने जिंकून उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे. मंगळवारी बेळगाव जिल्हा संघाचा सामना बिदर संघाबरोबर सकाळी 7 वा. खेळविण्यात येणार आहे.
बेळगाव फुटबॉल संघटनेचे पॅट्रन राम हदगल, अध्यक्ष पंढरी परब, सचिव अमित पाटील व इतर सभासदांनी जिल्हा संघाचे अभिनंदन करून पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.