प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव पोस्ट विभागात पोस्ट लिफाफा (ऍनव्हलप)चा मागील महिन्याभरापासून तुटवडा आहे. लिफाफा नसल्याने आर्थिक तसेच कायदेशीर नोटीस पाठविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. पोस्ट कार्यालयांमध्ये याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडूनही नेमके उत्तर मिळत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या या समस्यांची दखल घेऊन पोस्ट विभागाने त्वरित 5 रूपयांचा लिफाफा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.
कोणतीही आर्थिक अथवा कायदेशीर नोटीस पाठविण्यासाठी पोस्ट विभागाच्या लिफाफ्याचा वापर होतो. बेळगाव परिसरात अनेक सहकारी, खासगी, राष्ट्रीयकृत बँका व सोसायटय़ा असल्याने त्यांना मोठय़ा प्रमाणात लिफाफ्यांची आवश्यकता लागते. परंतु मागील महिन्याभरापासून लिफाफ्यांचा तुटवडा आहे. बेळगावमधील सर्रास पोस्ट कार्यालयांमध्ये लिफाफा नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना पोस्ट कार्यालयातून माघारी फिरावे लागत आहे.
एच. बी. हसबी (पोस्ट अधिक्षक)
लिफाफा तयार करणारे सर्कल स्टॅम्प डेपो कार्यालय बेंगळूर येथून हुबळी येथे हलविण्यात आले. हे स्थलांतराचे काम अद्याप सुरू असल्याने लिफाफ्याचा तुटवडा होता. परंतु पुढील दोन दिवसात बेळगावमधील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये लिफाफे उपलब्ध करून देण्यात येतील असे एच. बी. हसबी यांनी सांगितले.