प्रवाशांची संख्या रोडावली : कोरोना प्रमाणपत्र सक्तीचा परिणाम : परिवहनचे उत्पन्न घटण्यास कारण : दैनंदिन दीड-दोन लाखांचा फटका
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या चार दिवसांपासून ठप्प झालेल्या बेळगाव-कोकण बससेवेला सोमवारपासून पुन्हा प्रारंभ झाला. मात्र, सोमवारी दिवसभरात बेळगाव बसस्थानकातून केवळ दोन बस कोकणात धावल्या. शिवाय कोकणातून बेळगाव बसस्थानकात केवळ एकच बस दाखल झाली. कर्नाटकातून कोकणात दोन व सिंधुदुर्ग जिल्हय़ातून बेळगावात केवळ एकच बस धावल्याने प्रवाशांची मात्र चांगलीच गैरसोय झाली. कोकणात धावणारी बससेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवास करावा लागत आहे. बेळगाव बसस्थानकातून (बेळगाव-राजापूर) व सिंधुदुर्ग जिल्हय़ातून (वेंगुर्ला-बेळगाव) तर बैलहोंगल आगारातून (बैलहोंगल-वेंगुर्ला) बस धावली.
बेळगाव बसस्थानकातून कोकणात दररोज 10 ते 15 बसेस धावतात. मात्र, सोमवारी केवळ दोनच बस धावल्याने प्रवाशांना इच्छीतस्थळी जाण्यासाठी खासगी वाहनांच्या प्रतीक्षेत थांबावे लागले. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे सीमा हद्दीवर कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत घट होऊन काही बसेस रिकाम्या फिरताना दिसत आहेत. परिवहनला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे कोकणातील काही बस परिवहन बंद ठेवल्या होत्या. गेल्या चार दिवसांपासून कोकणातील बससेवा ठप्प झाल्याने बेळगाव विभागाला दैनंदिन दीड-दोन लाखांचा फटका बसत आहे. आधीच कोरोनामुळे बससेवा विस्कळीत झाल्याने तोटय़ात बससेवा सुरू आहे. शिवाय काही बसगाडय़ा रिकामी धावत आहेत. काही बसगाडय़ा जागेवर थांबून आहेत. त्यामुळे परिवहनला फटका बसत आहे.
कोकणातील वेंगुर्ला, सावंतवाडी, राजापूर, मालवण, कुडाळ आदी शहरांकडे बेळगाव बसस्थानकातून दररोज बसेस धावतात. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बेळगाव-कोकण आंतरराज्य बससेवेवर परिणाम झाला आहे. गतवर्षीही आंतरराज्य बससेवेवर परिणाम झाला होता. दरम्यान, सहा महिन्यांहून अधिक काळासाठी बससेवा ठप्प होती. अनलॉकनंतर सुरू झालेल्या बससेवेला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे परिवहनची बससेवा तोटय़ात सुरू होती. अलीकडे थोडय़ाफार प्रमाणात परिवहनचे उत्पन्न वाढत असताना पुन्हा कोरोनाने हाहाकार माजविल्याने परिवहन अडचणीत आले आहे.
कोकणातील बस शिनोळी फाटय़ापर्यंत
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा हद्दीवरील वाहतुकीवर व प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. शिनोळी चेकपोस्टवर प्रवाशांची व महाराष्ट्रातून येणाऱया वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. महाराष्ट्रातून येणाऱया बसेसना कर्नाटकात प्रवेश नाकारला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाल परी शिनोळी फाटय़ावर थांबलेली पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱया प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे.
लवकरच बससेवा सुरळीत सीमा हद्दीवर कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे केल्याने प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे काही बसगाडय़ा रिकामी धावत आहेत. त्यामुळे तोटा सहन करावा लागत आहे. सोमवारी कोकणात दोन बस धावल्या असल्या तरी सर्वच बससेवा सुरळीत केली जाणार आहे, असे केएसआरटीसीचे विभागीय संचार अधिकारी के. के. लमाणी यांनी सांगितले.