वार्ताहर/ किणये
अलीकडे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आपल्या गावातून कोरोनाला हद्दपार करण्याचा ठाम निर्धार बेळगुंदी ग्रामस्थांनी केला आहे. गावात शनिवारपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला असून याला नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये सर्दी, ताप, खोकला रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळे ग्रामीण जनता भयभीत होत आहे. बेळगुंदी गावातही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यांना सध्या होम क्वारंटाईन करून उपचार सुरू आहेत. यापुढे गावात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये म्हणून ग्रामस्थ पंच कमिटी व ग्राम पंचायतीमार्फत बेळगुंदी गावात आठ दिवस कडक लॉकडाऊन करण्याचे ठरविले आहे. शनिवार दि. 8 रोजीपासून दि. 15 रोजीपर्यंत गावात कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला असून शनिवारी या लॉकडाऊनला गावातील सर्व व्यवहार दुकाने बंद ठेवून नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी हे गाव बाजारपेठेसाठी महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात सध्या कडक लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे तुडये, शिनोळी परिसरातील नागरिक विविध प्रकारच्या खरेदीसाठी बेळगुंदी गावात येत होते. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ पंच कमिटी यांनी विशेष बैठक घेऊन गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून लॉकडाऊन करण्याचे ठरविले आहे. या लॉकडाऊन काळात सकाळी 8 पर्यंत केवळ दूध डेअरी व्यतिरिक्त औषध दुकाने व दवाखाने सुरू राहतील. बाकीची सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले.
शनिवारी सकाळपासूनच गावाने पुकारलेल्या जनहितासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. ग्रामस्थ पंच कमिटी व ग्राम पंचायत सदस्यांनी शनिवारी सकाळी गावात फेरफटका मारून पाहणी केली.
स्वयंस्फुर्तीने बेळगुंदी ग्रामस्थांनी लॉकडाऊन सुरू केले आहे. मात्र, बेळगुंदी मुख्य रस्ता असल्यामुळे सोनोली, बिजगर्णी, बेळवट्टी, यळेबैल, राकसकोप येथील नागरिकांना या रस्त्यावरूनच ये-जा करावी लागते. बाहेरगावच्या लोकांना रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी मुभा देण्यात येत आहे. पण बाहेरील व्यक्तीस गावात प्रवेशबंदी केली आहे.
स्वयंस्फुर्तीने पुकारण्यात आलेल्या पहिल्या दिवसाच्या लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून प्रत्येक गल्ल्यांमधील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यामुळे शनिवारी गावात नीरव शांतता पसरली होती..