ढाका : बॉनेरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर गुरूवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत विंडीजने यजमान बांगलादेशविरूद्ध पहिल्या डावात 5 बाद 223 धावा जमविल्या. बॉनेर 74 धावांवर खेळत आहे.
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत विंडीजने पहिली कसोटी जिंकून बांगलादेशवर 1-0 अशी आघाडी यापूर्वी मिळविली आहे. या दुसऱया सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार क्रेग ब्रेथवेट आणि कँपबेल यांनी डावाला बऱयापैकी सुरूवात करून देताना 66 धावांची भागिदारी केली. तैजुल इस्लामने कँपबेलला पायचीत केले. त्याने 5 चौकारांसह 36 धावा जमविल्या. त्यानंतर अबु जायेदने मोसलीला 7 धावांवर त्रिफळाचीत केले. उपाहारापर्यंत विंडीजने 1 बाद 84 धावा जमविल्या होत्या. खेळाच्या दुसऱया सत्रात कर्णधार ब्रेथवेट सौम्या सरकारच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
त्याने 4 चौकारांसह 47 धावा जमविल्या. या मालिकेतील पहिल्या कसोटीत द्विशतक झळकविणारा मेयर्स अबु जायेदच्या गोलंदाजीवर 5 धावांवर झेलबाद झाला. विंडीजची स्थिती त्यावेळी 4 बाद 116 अशी होती. मात्र बॉनेर आणि ब्लॅकवूड यांनी संघाचा डाव सावरताना पाचव्या गडय़ासाठी 62 धावांची भागिदारी केली. तैजुल इस्लामने स्वतःच्या गोलंदाजीवर ब्लॅकवूडचा झेल घेतला. ब्लॅकवूडने 5 चौकारांसह 28 धावा जमविल्या. बॉनेर आणि डिसिल्वा यांनी दिवसअखेर सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 45 धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरला. बॉनेर 6 चौकारांसह 74 तर डिसिल्वा 22 धावांवर खेळत आहे. विंडीजने दिवसअखेर 90 षटकांत 5 बाद 223 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे अबु जायेदने 46 धावांत 2, तैजुल इस्लामने 64 धावांत 2 तर सरकारने 30 धावांत 1 गडी बाद केला. संक्षिप्त धावफलक ः विंडीज प.डाव 90 षटकांत 5 बाद 223 (बॉनेर खेळत आहे 74, ब्रेथवेट 47, कँपबेल 36, मोसली 7, मेयर्स 5, ब्लॅकवूड 28, डिसिल्वा खेळत आहे 22, अबु जायेद 2-46, तैजुल इस्लाम 2-64, सरकार 1-30).