दोन तोळय़ांचे दागिने, दानपेटीतील सुमारे 25 ते 30 हजार रुपये पळविले
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये चोऱया, घरफोडय़ांचे सत्र सुरूच आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गुन्हेगार पूर्ण प्रमाणात सक्रिय झाले आहेत. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे गुन्हेगारी वाढीस लागली आहे. घरफोडय़ांबरोबरच चोरटय़ांनी आता मंदिरेही लक्ष्य बनविली आहेत.
बोडकेनहट्टी, ता. बेळगाव येथील काळम्मादेवी मंदिरात चोरीचा प्रकार घडला आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली असून रविवारी सकाळी ती उघडकीस आली आहे. चोरटय़ांनी मंदिराचा कडीकोयंडा तोडून देवीच्या अंगावरील दोन तोळय़ांचे दागिने व दानपेटीतील सुमारे 25 ते 30 हजार रुपये पळविले आहेत.
रविवारी रात्री यासंबंधी काकती पोलिसांशी संपर्क साधला असता घटना घडली आहे, मात्र एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱयाच्या बदलीनंतर काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गुन्हेगारी वाढली आहे. याच पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील मंदिरे चोरटय़ांनी लक्ष्य बनविली आहेत.
ऐन दसरोत्सवात होनगा येथील कलमेश्वर मंदिरात चोरीचा प्रकार घडला होता. चोरटय़ांनी सुमारे 12 किलो चांदीचा मुखवटा पळविला आहे. साडेसात लाखांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त कलमेश्वराला चांदीचा मुखवटा घालण्यात आला होता. दसऱयाच्या दिवशीच चोरीचा हा प्रकार घडला होता. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. चोरटय़ांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तरीही पोलीस चोरटय़ांपर्यंत पोहोचू शकले नाहीत, अशी परिस्थिती आहे.
पोलिसांची खुशाली तर गुन्हेगारांची दिवाळी
महामार्गाला लागूनच काकती पोलीस स्थानक आहे. अनेक खेडी या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येतात. महामार्गावर ढाब्यांची संख्या अधिक आहे. रात्र झाली की अधिकारी व पोलिसांची वाहने ढाब्याकडे वळू लागतात. गुन्हेगारी रोखण्यावर भर देण्याऐवजी खाबूगिरी करण्यातच पोलीस धन्यता मानत आहेत. गावोगावी गावठी दारुविक्री, बेकायदा दारुविक्री, मटका, जुगारी अड्डे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. पोलीस या अड्डय़ांवर दिवाळीची खुशाली मागण्यात व्यग्र आहेत. तर गुन्हेगार मैदानात उतरले आहेत. पोलीस यंत्रणेला जाग आणण्याची जबाबदारी असणारे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन या सुस्त यंत्रणेवर कोणता इलाज करणार? याकडे बेळगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे.