प्रतिनिधी / शिरोडा :
बोरी सर्कलजवळ वीज खात्याचा ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात वीज खात्याच्या तिघा कर्मचाऱयांचा दुर्दैवी अंत झाला. अन्य तिघे कर्मचारी गंभीर जखमी झाले असून अन्य तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे. वीज खांब घेऊन हा ट्रक मडगावहून माशेलकडे निघाला होता. ट्रकमध्ये वीजखात्याच्या माशेल उपकेंद्रावरील नऊ कर्मचारी होते. गुरुवारी दुपारी 1.30 वा. सुमारास मडगाव-फोंडा महामार्गावरील बोरी सर्कलजवळ ही दुर्घटना घडली.
पुंडलिक फोंडू जल्मी (45, रा. खांडोळा), समीर राजाराम परब (42, पिंपळवाडा-आमोणा) व सगुण लक्ष्मण गावस (28, रा. मानसवाडा-आमोणा) अशी या अपघातात ठार झालेल्या कर्मचाऱयांची नावे आहेत.
गंभीर जखमींवर गोमेकॉत उपचार
प्रणव नाईक (रा. कुंभारजुवे), घनश्याम नाईक (तिवरे-माशेल) व विनायक गावडे (भोम) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरु आहेत.
ट्रकचालक प्रदोष नाईक (रा. शिरोडा), समिमुल्ला खान (रा. दत्तगड-बेतोडा) व लाडू काणकोणकर (करमळी-तिसवाडी) हे किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातामुळे वीज खात्याला प्रंचड हादरा बसला आहे.
खांडोळेसाठी वीज खांब घेऊन जात होते कर्मचारी
दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱयामुळे झालेल्या पडझडीत बेतकी-खांडोळा भागात बरेच वीज खांब मोडून पडल्याने त्याजागी नवीन खांब घालण्याचे काम सुरु आहे. हे वीज खांब आणण्यासाठी गुरुवारी सकाळी माशेल उपकेंद्रावरील हे नऊ कर्मचारी मडगावला गेले होते. जीए 01 जी 7527 या क्रमांकाच्या टिप्पर ट्रकमधून दहा खांब घेऊन माशेलकडे परत येताना वाटेत बोरी सर्कलजवळ हा अपघात झाला. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ब्रेक निकामी झाल्याने अपघात
या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या एक कर्मचाऱयाने दिलेल्या माहितीनुसार ट्रकच्या कॅबिनमध्ये चालकासह तिघे तर मागील हौद्यात सहाजण होते. बोरी पूल ओलांडल्यानंतर उतरणीवर ट्रक पोचला असता, चालकाने ब्रेक निकामी झाल्याची कल्पना अन्य दोघांना दिली. मागे बसलेल्या सहाजणांना ते सावध करणार एवढय़ात समोरील वळणावर ट्रक उलटला.
ट्रक एका बाजुने उलटताच पाठिमागे बसलेले तिघे कर्मचारी नेमके खांबाखाली अडकून चिरडले गेले, तर इतर तिघे बाजूला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. 108 रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने गोमेकॉत हलविण्यात आले. खांबाखाली दबलेल्या तिघांचे मृतदेह साधारण अर्ध्या तासानंतर क्रेनच्या साहाय्याने ट्रक व खांब बाजूला हटवून बाहेर काढावे लागले. चालकासह कॅबिनमधील तिघांवर फोंडा उपजिल्हा इस्पितळात उपचार करुन नंतर घरी पाठवण्यात आले.
बोरी सर्कलजवळ अवजड वाहनांना कायम धोका
ज्या बोरी सर्कलजवळ हा अपघात झाला, त्या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. मडगावहून फोंडय़ाकडे येताना बोरीचा पूल ओलांडल्यानंतर उतरणी व मोठे वळण लागते. मालवाहू अवजड वाहने याठिकाणी उलटून अनेक अपघात झाले आहेत. ही जागा अपघातप्रवण बनल्याने रस्त्याचा विस्तार करुन सर्कलचा आकार कमी करण्याची मागणी बोरी पंचायतीने अनेकवेळा केलेली आहे, अशी माहिती बोरीचे उपसरपंच सुनिल सावकार यांनी दिली.