शिरोडा आरोग्य केंद्रा 12 रुग्णांची नोंद
प्रतिनिधी /शिरोडा
कोरोनाचा संसर्ग सध्या नियंत्रणात असला तरी डेंग्यूने आता डोके वर काढले आहे. शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱया शिरोडा, बोरी व बेतोडा पंचायत क्षेत्रात आत्तापर्यंत डेंग्यूचे 12 डेंग्यू आढळून आले आहेत. खबरदारीच्या उपययोजना म्हणून या रुग्णांवर उपचार करतानाच, संबंधीत भागात धूर फवारणी केली जात आहे.
शिरोडा आरोग्य केंद्रातर्फे डेंग्युचे रुग्ण आढळलेल्या भागांची पाहणी करुन या रोगाची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपायासंबंधी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. डेंग्यूचा फैलाव डांसामुळे होत असल्याने बोरी भागात रुग्ण आढळल्याचे कळताच पारपतीवाडा बोरी येथील पंचसदस्य विनय पारपती यांनी पुढाकार घेऊन आरोग्य खात्याच्या साहाय्याने या प्रभागात धूर फवारणी करुन घेतली. डांसाची पैदार रोखण्यासाठी उघडय़ावर सांडपाणी सोडू नये तसेच घरा सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन विनय पारपती यांनी केले आहे.
शिरोडा आरोग्य केंद्राच्या डॉ. सुनीता रेडकर यांनी डेंग्यूचा प्रसार हा शिरोडा मतदारसंघातील एकाच भागात झालेला नसून विविध भागात रुग्ण आढळल्याचे सांगितले. आत्तापर्यंत आढळलेल्या रुग्णांवर योग्यप्रकारे उपचार केले जात असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खबरदारीचे उपाय म्हणून आरोग्य केंद्रातर्फे रुग्ण सापडलेल्या भागात पंचायतीच्या मदतीने धूर फवारणी व अन्य उपाययोजना आखल्या जात आहेत. डेंग्यूच्या फैलावास डास कारणीभूत असल्याने आपला परिसर स्वच्छ ठेऊन मच्छरांची पैदास रोखण्यासाठी सांडपाण्याचा योग्य प्रकारे निचरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अंगात ताप आल्यास व अन्य लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. रेडकर यांनी केले आहे.