ऑनलाईन टीम / लंडन :
ब्रिटनने फायझर-बायोटेकच्या कोरोनावरील लसीला मंजुरी दिली आहे. यामुळे पुढील आठवड्यात ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
फायझर-बायोटेकची ही लस कोरोनावर 95 टक्के प्रभावी आहे. ही लस व्यापक वापरासाठी योग्य असल्याचे ब्रिटिश नियामक MHRA ने म्हटले आहे. ज्या लोकांना सर्वाधिक गरज आहे, त्यांना प्राधान्याने ही लस देण्यात येणार आहे.
या लसीची आतापर्यंत 43,000 लोकांवर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये लसीच्या सुरक्षेबाबत कोणतेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले नाही. त्यामुळे फायझर कंपनीने अमेरिकेमध्येही लसीला मंजुरी मिळविण्यासाठी अर्ज केला आहे.
ब्रिटनमध्ये आतापर्यंत 16.43 लाखांहून अधिक जण बाधित झाले आहेत. तर 59 हजार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.