कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत 48290 जणांचा मृत्यू झाला असून 950652 वर रुग्णसंख्या पोहोचली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांमध्येच जगभरातील रुग्णांची संख्या वाढून 10 लाखावर जाणार असल्याचे म्हणत बळींचा आकडा 50 हजारावर पोहोचणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. तर स्पेनमध्ये गुरुवारी 616 जणांना जीव गमवावा लागला आहे. तसेच देशात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 10 हजारापेक्षा अधिक झाला आहे. काही महिन्यांपूर्वी जगातील बहुतांश लोक कोरोना विषाणूसंबंधी अनभिज्ञ होते, परंतु विषाणूने आता जगातील प्रत्येक हिस्स्याला बाधित केले आहे. रुग्णांची संख्या कुठल्याही दिवशी 10 लाखांपर्यंत पोहोचू शकते. विषाणूच्या संसर्गाला 4 महिने पूर्ण झाले आहेत. मागील 4 महिन्यांपासून संसर्गाचे रुग्ण प्रत्येक देशात वेगाने वाढत आहेत. मागील आठवडय़ाच्या तुलनेत मृतांची संख्या दुप्पट झाल्याचे उद्गार जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रेस गेबेयेसियुस यांनी काढले आहेत.
अमेरिका : व्योमिंगमध्ये बळी नाही
अमेरिकेच्या 50 प्रांतांपैकी केवळ व्योमिंगमध्येच एकही बळी गेलेला नाही. या प्रांतात 137 रुग्ण सापडले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये रुग्णसंख्या 83 हजार 712 झाली आहे. तर सुमारे 1941 जणांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना विषाणूची अँटीबॉडी टेस्ट चालू महिन्यातच उपलब्ध होऊ शकते. सर्व विद्यापीठे आणि प्रांतांना एलिसा (एंझाइम-लिंक्ड इम्युनोसोर्बेंट एसे) विकसित करण्याचे आवाहन केले आहे. एलिसा रक्तात अँटीबॉडीची तपासणी आणि मोजणी करते. ही टेस्ट कोरोना संसर्ग झालेला असूनही त्यासंबंधी ज्ञात नसणाऱया आरोग्य कर्मचाऱयांची ओळख पटविण्यास मदत करू शकते, असे विधान अमेरिकेचे आरोग्य तज्ञ डेबोराह ब्रिक्स यांनी केले आहे.
देशांतर्गत उड्डाणे रद्द होणार
अमेरिकेतील देशांतर्गत विमानोड्डाणे तसेच रेल्वेसेवा रद्द केली जाऊ शकते. अनेक विमानोड्डाणे कोरोनाग्रस्त शहरांसाठी होत असून हा प्रकार चुकीचा आहे. सर्वच विमानोड्डाणे रद्द करण्याच्या बाजूने नसलो तरीही लवकरच यासंबंधी निर्णय घेतला जाणार आहे. संकटग्रस्त शहरांमधील वाहतूक रोखली जाऊ शकते, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी एका गुप्तचर अहवालाचा दाखला देत चीनच्या अधिकृत आकडेवारीवर संशय व्यक्त केला आहे. चीनचा आकडा विश्वासार्ह वाटत नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटल्याने दोन्ही देशांमधील वाद वाढण्याची चिन्हे आहेत.
ब्रिटनमध्ये पोलिसाला धमकी
ब्रिटनमध्ये एका इसमाने पोलीस अधिकाऱयाला शिंकून कोरोनाने बाधित करण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी संबंधित इसमाला 6 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 55 वर्षीय एजम लेविसला पोलिसांनी तपासणीसाठी रोखले हेते. परंतु या कारणाने संतप्त एजमने कोरोनाचा रुग्ण असल्याचे सांगत चेहऱयाच्या दिशेने शिंकणार असल्याची धमकी पोलिसांना दिली होती. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 29474 रुग्ण आढळून आले असून 2352 जणांना जीव गमवावा लागला आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ब्रिटनमध्ये बुधवारी 563 जणांनी जीव गमावला आहे.
फिलीपाईन्स : गोळय़ा घालण्याचा आदेश
फिलीपाईन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दुर्तेते यांनी क्वारेंटाईनदरम्यान हिंसक निदर्शकांना रोखण्यासाठी गोळी झाडण्याचा आदेश दिला आहे. मेट्रो मनिलामध्ये लोकांना भोजन वाटपादरम्यान डावे निदर्शकांनी हिंसाचार केला आहे. कायदा-सुव्यवस्था अडचणीत आणणाऱया तसेच इतरांचा जीव धोक्यात घालणाऱयांवर गोळय़ा झाडण्याचा आदेश पोलीस तसेच सैन्याला दिला आहे. नागरिकांनी आदेशांचे पालन करत कायदा-सुव्यवस्था राखण्याची गरज असल्याचे दुर्तेते म्हणाले.
इटलीत 13 हजार बळी
इटलीत बुधवारी 727 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण बळींचा आकडा आता 13155 वर पोहोचला आहे. देशातील रुग्णांचा आकडा आता 110574 झाला असून टाळेबंदीची मुदत 13 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. इटलीतील लोम्बार्डी या प्रांतात कोरोनाने सर्वाधिक नुकसान घडवून आणले आहेत. इटलीतील नव्या रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट दिसून येत असल्याने स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.
स्पेनमध्ये लाखाहून अधिक रुग्ण
कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 लाखापेक्षा अधिक असणारा स्पेन आता तिसरा देश ठरला आहे. तेथील एकूण रुग्णांची संख्या आता 110238 झाली आहे. तर बळींचा आकडा 10003 वर पोहोचला आहे. इटलीनंतर स्पेन युरोपमधील सर्वाधिक बाधित देश आहे. स्पेनमध्ये सैन्य तैनात करण्यात आले असून आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढल्याचे दिसून येत आहे. देशभरात संचारबंदी असून सर्व वाहतूक यंत्रणा बंद करण्यात आल्या आहेत.
चीनमध्ये नवा निर्णय
चीनने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्राण्यांचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पशू कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या प्रकारामुळे अवैध पशू व्यापाराला अधिक बळ मिळणार असल्याची त्यांनी भीती व्यक्त केली आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूचे उगमस्थान मानले गेलेल्या वुहान शहरातच प्राण्यांच्या अवैध व्यापाराची मोठी बाजारपेठ आहे. चीनमध्ये आतापर्यंत 81589 रुग्ण आढळून आले आहेत. तर 3 हजार 318 जणांना जीव गमवावा लागला आहे.
पाकिस्तानात रुग्ण वाढले
पाकिस्तानात रुग्णांची संख्या 2291 वर पोहोचली आहे. तर 31 जणांना जीव गमवावा लागला आहे. तेथे सिंध (709) आणि पंजाब (845) प्रांतात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी कोरोना विरोधी लढाईसाटी राष्ट्रीय एकजुटतेचे आवाहन केले आहे. पाकिस्तानात सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आरोग्य विषयक तज्ञ व्यक्त करत आहेत.
इस्रायलमध्ये 31 बळी
इस्रायलमध्ये आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 6 हजार 211 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार मागील 24 तासांमध्ये देशात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 95 रुग्णांची प्रकृती गंभीर असून 241 जणांना कोरोना संसर्गापासून मुक्तता मिळाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नेदरलँडमध्ये लोकांना निर्देश
नेदरलँडमध्ये 24 तासांमध्ये 134 जणांचा मृत्यू झाला असून 1019 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर देशातील एकूण रुग्णांची संख्या वाढून 13614 झाली आहे. सरकारकडून या पार्श्वभूमीवर लोकांसाठी नवे दिशानिर्देश देण्यात आले आहेत. यात लोकांना किमान दीड मीटरचे अंतर राखण्यास सांगण्यात आले आहेत. लोकांना घरातच थांबण्याची सूचना केली जात आहे. सर्व शाळा, व्यायामशाळा, स्पोर्ट्स क्लब, रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहेत. कोरोना संकटामुळे नेदरलँडमधील आरोग्य यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.