मालवण/वार्ताहर –
भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद भगत यांनी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा पाया भक्कम झाला. मिलिंद भगत यांनी घडविलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. हि त्यांच्या शैक्षणिक कार्याचे फळ आहे. असे प्रतिपादन भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर यानी येथे बोलताना केले.
भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद भगत यांचा सेवानिवृत्तपर सत्कार कार्यक्रम प्राथमिक शाळा येथील सभागृहात आयोजीत करण्यात आला होता. यावेळी विजय पाटकर हे बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, सुधीर हेरेकर, साबाजी करलकर, जॉन नऱहोना, भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक वामन खोत, प्राथमिकचे मुख्याध्यापक मिलिंद भगत, सौ. मनाली भगत, भूपेश गोसावी, प्रज्ञा कांबळी, सौ. राधा दिघे, दिनेश खोत, गणपत चौकेकर, रेनोल्ड भूतेलो, आदि उपस्थित होते.