ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंजाबमधील आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी आज चंदीगडमधील राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. मान हे शहीद भगतसिंग यांना मानतात. त्यांच्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव असल्याचे ते सांगतात. त्यामुळे मान यांनी त्यांचा शपथविधी शहीद भगतसिंग यांच्या मूळगावी खाटकर कलान येथे घेतला आहे. 16 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे.
आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पंजाबमधील लोकही या शपथविधी सोहळय़ाला येतील. यावेळी लोक भगतसिंग यांना अभिवादनही करतील. आमच्याकडे चांगलं मंत्रिमंडळ असेल जे ऐतिहासिक निर्णय घेतील जे यापूर्वी कधीही घेतले गेलेले नाहीत. यासाठी तुम्हाला फक्त काही काळ वाट पाहावी लागेल, असे मान यांनी म्हटले आहे.
दरम्यान, 13 मार्चला भगवंत मान हे अमृतसरमध्ये रोड शो करणार असून, विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे.