ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंजाबचे नामनिर्देशित मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला. पंजाबच्या संगरुर मतदारसंघातून भगवंत मान दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. बुधवारी मान हे शहीद भगतसिंग यांच्या मूळ गावी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
राजीनामा देण्यापूर्वी भगवंत मान म्हटले आहे की, ”मला या सभागृहाची खूप आठवण येईल. मात्र पंजाबच्या लोकांनी मला त्यांची सेवा करण्यासाठी खूप मोठी जबाबदारी दिली आहे. यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मी संगरुरमधील लोकांना वचन देतो की, त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी आणखीन एक आवाज या सभागृहात येणार.”
पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 117 पैकी 92 जागांवर विजय मिळवला आहे. आता पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार बनणार आहे. 16 मार्चला भगवंत मान शहीद भगतसिंग यांचे मूळ गाव खटकर कलान येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.