प्रतिनिधी /वास्को
श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सवाला उद्या बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. भजनी सप्ताहानिमित्त आज मंगळवार दि. 2 रोजी श्री दामोदर पुनःप्रतिष्ठापना दिनी सायंकाळी 7 वा. मंदिरासमोर उभारलेल्या मंडपात खास संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सव समितीतर्फे यावेळी गायक जयतिर्थ मेहुंडी (धारवाड) यांना आमंत्रीत करण्यात आलेले असून त्यांना ऑर्गनवर दत्तराज सुर्लकर, हार्मोनियमवर दत्तराज म्हाळशी, तबल्यावर अजिंक्य जोशी (पुणे), पखवाजवर प्रथमेश तारळकर (पुणे) व मंजिरीवर योगेश रायकर साथसंगत करतील.
मागच्या दोन वर्षांच्या खंडानंतर यंदाचा भजनी सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येत असून सप्ताहाची पूर्वतयारी अखेरच्या टप्प्यात आलेली आहे. यंदा सप्ताहानिमित्त भरगच्च फेरी भरणार असून मागच्या दोन दिवसांपासून फेरी भरण्यास प्रारंभ झालेला आहे. सोमवारी रात्रीपर्यंत पन्नास टक्के फेरी उभारून पूर्ण झाली होती. वास्कोतील विन्सन वर्ल्ड यांच्यातर्फे शहरातील हुतात्मा चौकात भव्य प्रवेशव्दाराची कमान उभारण्यात आलेली आहे. शहरात भजनी सप्ताहाचा माहोल फेरीच्या आगमनाने तयार झालेला आहे. मागची दोन वर्षे कोरोना प्रसाराच्या भितीने अगदी साध्या पध्दतीने भजनी सप्ताह साजरा करण्यात आला होता. यंदा काही मर्यादीत निर्बंध मंदिरात प्रवेश करण्यासंबंधी घालण्यात आलेले आहेत.