प्रतिनिधी / करमाळा
भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने धडक देऊन रस्त्याने चालत जात असलेल्या आजोबा व नातवाला जखमी केल्याचा प्रकार घोटी येथे घडला आहे. शुक्रवारी (ता. १८) घोटी ते केम रस्त्यावर हा अपघात झाला आहे. यात मुलाच्या डोक्याला मर लागला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी समाधान बापुराव थोरात (वय 28, रा. घोटी, ता. करमाळा, जि. सोलापुर) यांनी करमाळा पोलिस ठाण्यात दि.19 फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली.
थोरात यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घरासमोर असताना वडील बापुराव व मुलगा चैतन्य घराच्या बाजुने जाणाऱ्या रस्त्याने घोटी गावाकडे चालत जात होते. तेव्हा केमच्या दिशेने एक दुचाकी भरधाव वेगाने आली. त्याने वडील बापुराव व मुलगा चैतन्य यांना समोरून जोराची धडक दिली.
तेव्हा वडील व मुलगा चैतन्य हे खाली पडले. मुलगा चैतन्यच्या डोक्याला व कंबरेला गंभीर दुखापत झाली. वडील बापुराव यांना हाताला, मनगटाला व मांडीला मुक्कामार लागला आहे. मोटरसायकल चालकाचे नाव व पत्ता समजला नाही. तो गाडी सोडुन पळुन गेला आहे. त्यानंतर जखमी मुलाला करमाळा उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथून वैध्यकीय अधिकारी प्राथमिक उपचार करून सोलापुर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे पाठवले होते. मात्र त्याला करमाळ्यातच एक रूग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्यातील मागील हाड फ्रक्चर झाले आहे.