ट्रस्टने शेअर केली छायाचित्रे-व्हिडीओ
अयोध्या / वृत्तसंस्था
अयोध्येतील श्री राम मंदिर कसे असेल… त्याची छायाचित्रे समोर आली आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने छायाचित्रे आणि व्हिडीओ जारी केले आहेत. या चित्रांमध्ये श्री राम मंदिराची भव्यता आणि दिव्यता स्पष्टपणे दिसते. अलीकडेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंदिराचे 50 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता ट्रस्टकडून काही छायाचित्रे जारी झाल्याने भाविकांचे औत्सुक्य वाढलेले दिसत आहे.
अयोध्येत निर्मितीकाम सुरू असलेले राम मंदिर 20 फूट उंचीच्या 392 खांबांवर उभे राहणार आहे. मंदिराचे शिखर 161 फूट उंच असेल. 161 फूट उंच मंदिराच्या विजयध्वजाची स्थापना करण्यासाठी मुख्य खांब बांधण्यात येत आहे. यावर विजयी पताका लावण्यात येणार आहे. त्याची संपूर्ण रूपरेषा तयार करण्यात आली आहे. मुख्य शिखरावर ध्वज उभारण्यात येणार आहे. याशिवाय आणखी 5 शिखर मंडप बांधले जाणार आहेत. ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये मंदिरासमोर किती मोठे हिरवेगार मैदान असेल हे स्पष्टपणे दिसत आहे. मंदिर परिसराची सुसज्जता आणि सुशोभीकरण अद्याप परिपूर्ण नाही. त्यात अजूनही बदल होणार असून मंदिर निर्माण समिती आणि राममंदिर ट्रस्ट यांच्यात बैठका सुरू असल्याचे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले.