मंत्री सुदिन ढवळीकर यांची प्रतिक्रिया : विजय सरदेसाईंच्या बोलण्याला महत्व नाही
प्रतिनिधी /म्हापसा
मगो पक्षाने मोप विमानतळाला स्व. भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव द्यावे, असा निर्णय घेतला असून तो पुढे नेण्याचे काम आपण करणार आहे. आज जे कुणी बसून आंदोलने करत आहेत ते एके काळी ‘होडीला भोक पाडले आणि उडी मारुन निघून गेले’ आणि आज ते बुडल्याने कटकारस्थान रचतात, असे म्हणून मंत्री ढवळीकर यांनी ऍड. रमाकांत खलप यांना टोला मारला आहे.
शिवोली येथे काल सोमवारी भूमिगत वीज वाहिन्यांच्या पायाभरणी कार्यक्रमावेळी ढवळीकर यांना मोप विमानतळाबाबत विचारले असता त्यांनी वरील वक्तव्य केले.
वीज खात्यात 350 कोटींची कामे
मुख्यमंत्रीपदाबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री ढवळीकर म्हणाले की आपल्यास त्याबाबत काही बोलायचे नाही. विजय सरदेसाई आमचे विरोधक असून ते मनात येईल ते बोलतात. त्यांना आम्ही महत्त्व देत नाही. मुख्यमंत्र्यांनी अवघ्या सहा महिन्यांत 350 कोटींची वीज खात्याची कामे मंजूर केली आहेत. यापेक्षा जनतेला आणि काय हवे आहे, असा प्रतिसवाल वीज मंत्र्यांनी केला.
नरकासुराचे दिवस असल्याने घोळ..?
हल्लीच वीज ग्राहकाला 57 लाखांचे बील आल्याबाबत मंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की डेसीमल पॉईंट घालण्यास विसरल्याने घोळ होऊन 57 लाखाचे बिल तयार झाले. कनिष्ठ अभियंता बिलिंगचे काम पाहतात. आता त्यांच्यावर कारवाई करावी की नाही हा निर्णय अभियंता घेणार आहे. अथवा तुम्ही जनतेने घ्यावा. ते दिवस नरकासुराचे होते आणि कदाचित तोही नरकासूराच्या मुडमध्ये होता असावा. म्हणून आपण वेळोवेळी नरकासूर नको असे सांगतो, असे सांगून अजब बिलाचा प्रकार उघडकीस आणल्याबद्दल मंत्र्यांनी पत्रकारांचे अभिनंदन केले.
अभियंत्यांची ताबडतोब तक्रार करा
वीज ग्राहक अभियंत्याकडे गेल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यास त्या बिलधारकांनी त्वरित तक्रार द्यावी. त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री ढवळीकर यांनी दिला. दोन वर्षे सेवा शिल्लक असलेल्या अभियंत्याने कार्यालयातील एका मुलीची छेडछाड केली होती. त्या मुलीची तक्रार आपल्याकडे आल्यावर आपण अभियंत्यास कार्यालयात बोलावून घेऊन त्याचक्षणी सेवानिवृत्त होण्यास भाग पाडले. असे गैरप्रकार आपण आणि भाजपा सरकार खपवून घेणार नाही. सर्वांनी काळजीपूर्वक काम करावे अन्यथा कारवाईस तयार रहा, असा स्पष्ट इशारा मंत्री ढवळीकर यांनी दिला.