पंढरपूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून नुकतीच उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.
गेल्या दोन दिवसापासून विधान परिषदेसाठी रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे नाव चर्चेत होते. यामध्ये जाता भाजपच्या यादीमध्ये मोहिते-पाटलांचे नाव समावेश झाल्याने त्यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला.
मोहिते-पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील एक मातब्बर राजकीय घराणे समजले जाते. लोकसभा निवडणुकीवेळी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघात मोहिते-पाटलांची भाजपला मोठी साथ लाभली. यातच मोहिते-पाटलांचे पुनर्वसन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ केली आहे. शुक्रवारी दुपारी मोहिते-पाटलांचे नाव निश्चित झाल्यावर माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक समर्थकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे