द्वेषयुक्त विचारसरणीला भारताचे लोक दूर सारणार
वृत्तसंस्था/ न्यूयॉक
काँग्रेस नेते राहुल गांधी हे स्वत:च्या अमेरिका दौऱ्यादरम्यान सातत्याने केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य करत आहेत. कर्नाटकात ज्याप्रकारे काँग्रेसने भाजपला पराभूत केले, त्याचप्रकारे तेलंगणा अन् अन्य राज्यांमध्येही काँग्रेस भाजपला पराभूत करणार आहे. केवळ काँग्रेस पक्ष नव्हे तर देशातील लोक भाजपच्या द्वेषयुक्त विचारसरणीला दूर सारतील असे राहुल यांनी म्हटले आहे.
वॉशिंग्टन आणि सॅन फ्रान्सिस्कोनंतर राहुल गांधी हे न्यूयॉर्क येथे पोहोचले. तेथे त्यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेस-युएसकडून आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले आहे. भाजपला पराभूत करू शकतो हे आम्ही कर्नाटकात करून दाखविले आहे. कर्नाटकत निवडणुकीत भाजपने प्रसारमाध्यमांन हाताशी धरण्यासह धनशक्तीचा वापर केला, भाजपच्या अनेक यंत्रणा होत्या, तरीही आम्ही भाजपला पराभूत केले आहे. तेलंगणाच्या निवडणुकीतही आम्ही भाजपला पराभूत करू असे राहुल यांनी म्हटले आहे.
निवडणुकीनंतर तेलंगणात भाजपला शोधणेही अवघड ठरणार आहे. याचबरोबर राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये देखील आम्ही कर्नाटकसारखी कामगिरी करू असा दावा राहुल यांनी केला आहे. चालू वर्षाच्या अखेरीस 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या विधानसभा निवडणुकांना अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
केवळ काँग्रेस नव्हे तर मध्यप्रदेश, तेलंगणा आणि राजस्थान तसेच छत्तीसगडचे लोक भाजपला पराभूत करतील. ज्याप्रकारे भाजप समाजात द्वेष पसरवितोय ते पाहता देश विकासाच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होणार आहे, विरोधी पक्ष एकजूट असून ही विचारसरणीची लढाई आहे, एकीकडे भाजपची फूट पाडणारी विचारसरणी आहे, तर दुसरीकडे काँग्रेसची एकता अन् प्रेम वाढविणारी विचारसरणी असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.