संदीप खांडेपारकर यांची घोषणा
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवारीवर आपला ठाम दावा असून गेली 22 वर्षे पक्षासाठी एकनिष्ठपणे केलेल्या कार्याची पक्ष निश्चितच दखल घेईल. उमेदवारी नाकारली गेल्यास आपण स्वतंत्र लढू अशी घोषणा फोंडय़ातील भाजपाचे पदाधिकारी संदीप खांडेपारकर यांनी केली आहे. भाजपाची उमेदवारी मिळणे हा आपला अधिकार आहे. सन् 2012 व 2017 च्या निवडणुकीत आपण तडजोड केली. यावेळी माघार नाही, असे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.
फोंडा मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून आपण घरोघरी प्रचार सुरु केलेला आहे. ऐनवेळी आपण माघार घेणार असा कार्यकर्ते व मतदारांमध्ये संभ्रम असू शकतो. मात्र तसा संभ्रम कुणीही न बाळगता आपण पूर्ण निष्ठेने व ताकदीने निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. गेली 35 वर्षे आपण सामाजिक कार्यात सक्रीय आहे. शिवाय भाजपासाठी 22 वर्षे एकनिष्ठपणे कार्य करीत आहे. पक्षाकडून आपल्या या कार्याची निश्चितच दखल घेतली जाईल, अशी पूर्ण खात्री आहे. भाजपाकडून उमेदवारी नाकारली गेल्यास, माघार न घेता स्वतंत्र उमेदवार म्हणून लढण्याचा आपला ठाम निश्चय आहे. फोंडय़ातील जनतेने आपल्याला यापूर्वीच उमेदवारी बहाल केलेली आहे. जनतेचे प्रेम व पाठिंब्यावर आपण निश्चितच विजयी होऊ असा दावाही त्यांनी केला.
आयात उमेदवारासाठी काम करणार नाही
पक्षाने आयात केलेल्या उमेदवाराला तिकिट दिल्यास त्याच्यासाठी काम करण्याची आपली अजिबात तयारी नाही. काही पक्षांकडून आपल्याला उमेदवारीचे प्रस्तावही आले होते. पण भाजप सोडून अन्य कुठल्याही पक्षातून लढण्यापेक्षा आपण स्वतंत्रपणे व स्वतःसाठी लढणार असे त्यांनी सांगितले. भाजपाचे बरेच कार्यकर्ते व मतदारही पक्षाच्या धोरणावर नाराज आहेत. पक्षाच्या आदेशामुळे भाजपा कार्यकर्ते कदाचित आपल्यासोबत उघडपणे वावरत नसले तरी मनाने ते आपल्यासोबत आहेत. त्यामुळे पक्षाने प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी की आयात उमेदवारांना याचा विचार करावा, असेही खांडेपारकर म्हणाले.