ऑनलाईन टीम / गुरुग्राम :
कोरोनावर यशस्वीरित्या मात करणारे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज प्लाझ्मा दान केले आहे. जेणे करुन अन्य कोरोना रुग्णांचे उपचार होण्यास अधिक मदत मिळेल. सध्या कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
त्यातच आज भाजप नेता संबित पात्रा यांनी गुरुग्राम मधील मेदांता रूग्णालयात प्लाझ्मा दान केले. संबित पात्रा यांनी ट्विट करून ही माहिती दिली. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने कार्यकर्त्यांना सेवाभावाचा मंत्र दिला आहे. या मंत्राने प्रेरित झालो आणि पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आशीर्वाद घेऊन मी आज प्लाझ्मा दान केले.
तसेच मी अशा सर्व लोकांना आवाहन करतो, ज्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशा लोकांनी प्लाझ्मा दान करावे. ज्यांनी कोरोनावर मात केली आहे, अशा व्यक्तींनी प्लाझ्मा दान केल्यास, जे रुग्ण आता कोरोनामुळे गंभीर अवस्थेत आहेत त्यांना याचा फायदा होऊ शकतो. कोरोना रुग्णांना हा प्लाझ्मा दिला जातो. या प्लाझ्मामध्ये प्रतिजैविके असतात. अनेक राज्यांनी आणि रुग्णालयांनी आता प्लाझ्मा बँकेची स्थापना केली आहे.
दरम्यान, पात्रा यांनी प्लाझ्मा दान करण्यापूर्वी नड्डा यांच्या भेटी सोबतचा फोटो देखील शेअर केला आहे.