फोंडा तालुक्यातील चारही भाजप मंडळांचा सवाल : ढवळीकरांनी भाजप, मुख्यमंत्र्यांना सातत्याने हिणवले.मगो पक्षाला विरोधकांच्या बाकावर बसवण्यातच हित
प्रतिनिधी /फोंडा
भाजपकडे सरकार स्थापनेत स्वतःचे 20 व 3 अपक्षाचे संख्याबळ असताना मगो पक्षाच्या पाठेंब्याची गरज का? असा सवाल भाजपाच्या मंडळाध्यक्षांनी उपस्थित केला आहे. भाजपा सरकार स्थापनेत मगो पक्षाचा पाठिंबा घेतल्यास फोंडा तालुक्यात पहिल्यांदा कमळ फुलविण्याबरोबर शिरोडा व प्रियोळ मतदारसंघातील विजयासाठी झटलेल्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल, असा दावा त्यांनी केला आहे. राजकीय संधीसाधू मगो पक्षाचा पाठिंबा कदापी घेऊ नये अशी जोरदार मागणी फेंडा तालुक्यातील चारही मतदारसंघांच्या मंडळाध्यक्षांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.
मतमोजणीपूर्वी आदल्या दिवशी आपणच किंगमेकर होणार, आणि दुसऱया दिवशी किंगमेकर नव्हे तर आपणच पिंग होणार, असे भाकित करून भाजपा एकेरी अंकात राहील. डॉ. प्रमोद सावंत सरकारात कदापी सहभागी होणार नसल्याची घोषणा करणारे सुदिन ढवळीकर यांनी निवडणुकीचे निकाल भाजपाच्या पारडय़ात पडल्यानंतर सरडय़ाप्रमाणे रंग बदलत सरकारला बिनशर्त पाठिंबा दर्शविण्याचा डाव साधलेला आहे. मगो पक्षाला सत्तेपासून दूर राहता येत नसल्यामुळेच त्यानी ही शक्कल लढविलेली आहे. त्याला भाजपाच्या पक्षशेष्टीनी बळी पडू नये असे आवाहन सर्व कार्यकारिणीच्या सदस्यानी भाजपाच्या पक्षश्रेष्टींना केले आहे.
फोंडा तालुक्यातील शिरोडा मतदरासंघाचे भाजप मंडळाध्यक्ष सुरज नाईक, प्रियोळचे मंडळाध्यक्ष बेतकीचे सरपंच दिलीप नाईक, फोंडय़ाचे मंडळाध्यक्ष नगरसेवक विश्वनाथ दळवी व मडकई मंडळाध्यक्ष प्रदीप शेट व इतर गट समित्यांनी जोरदार आक्षेप घेत मगो पक्षाला सरकारात समाविष्ट करून घेऊ नये अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. मगो पक्षाला सरकार स्थापनेत घेतल्यास येणाऱया पंचायत निवडणुकीत भाजपाला जबर फटका बसणार असल्याचा इशाराही दिला आहे.
मगोने शिरोडेच्या विकासात घातला खो
शिरोडा मंडळाध्यक्ष सुरज नाईक यांनी शिरोडय़ातील मगोच्या कुरापतीविषयी बोलताना सांगितले की 2019 साली पोटनिवडणुकीत भाजपा सरकाराबरोबर मगो सत्तेत असताना शिरोडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत बंधू दीपक ढवळीकर यांना जाहीर पाठिंबा दिला होता. डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविड काळात कोरोनाबाधितांना विलगीकरणाची सोय व्हावी म्हणून डॉ. सखाराम गुडे सरकारी इस्पितळात सोय करताना त्याला विरोध करण्याची भूमिका मगो पक्षाने घेतली होती. डॉ. प्रमोद सावंत यांनी मगो पक्षाचा पाठिंबा स्वीकारू नये असे सांगितले.
सुदिन ढवळीकर सत्तेविना राहूच शकत नाही
सचिव अवधूत नाईक म्हणाले की सुदिन ढवळीकर सत्तेविना राहूच शकत नाही ही वस्तुस्थिती सर्व जनतेला माहीत आहे. निवडणुकीत टीएमसीसोबत युती केल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांचे ‘सावंत धेंडीबा सरकार’ म्हणून हिणवणाऱयांना कदापी सरकारात समाविष्ट करून घेऊ नये. भाजपाच्या विजयासाठी झटलेल्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, महामंत्री सतिश धोंड व डॉ. प्रमोद सावंत यांच्याबद्दल नेहमी कटू शब्दात तिरस्कार करणाऱया मगो पक्षाला समावेश करू नये.
निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय होईल
मडकईचे भाजपा मंडळाध्यक्ष प्रदीप शेट यांनी सांगितले की मागील 22 वर्षापासून मडकईत मगो सत्तेवर आहेत. यावेळी भाजपासाठी कार्य करण्यासाठी कार्यकर्ते आपण जमविलेले आहे. स्व. मनोहर पर्रिकर यानीही मडकईतील भाजपाच्या कार्यकर्त्यासाठी न्याय दिलेला नाही. डॉ. प्रमोद सावंत यांनी मडकईत भाजपा कार्यकर्त्याचे पश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्यावर भर दिलेला आहे. मगो सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाण्यासाठी प्रयत्न करणार असून मडकईत निष्ठांवत भाजपा कार्यकर्त्याना न्याय मिळवून देण्यासाठी सुदिन ढवळीकर यांना सरकार स्थापनेत समावेश करू नये अशी मागणी केली. यावेळी मडकई भाजपाचे युवाध्य़क्ष सुभम किर्लपालकर, महिला आयुक्त विद्या गावडे, महिला मोर्चा अध्यक्ष शर्मिला लोटलीकर, शिवानंद फडते, प्रमोद गावडे, विनोद पोकळे, शशी नाईक उपस्थित होते.
मगोला दूर ठेवण्यातच भाजप, जनतेचे हित
प्रियोळ भाजप मंडळाध्यक्ष दिलीप नाईक यांनी जोरदार विरोध करताना अडीच वर्षे सत्तेपासून बाहेर राहिल्यामुळे मगो पक्ष सत्तेसाठी हपापलेला असल्याचे म्हटले. फोंडा तालुक्यातील भाजपाच्या कार्यकर्ते, जनता यांना सुगीचे दिवस दाखविण्यासाठी मगो पक्षाला सत्तेपासून दूर ठेवा असे आवाहन पक्षशेष्टीना केले आहे. प्रियोळ, फोंडा, शिरोय़ात कमळ फुलविलेले आहे. आगामी निवडणुकीत या तीनहीबरोबरच मडकईतही कमळ फुलविण्यासाठी सुदिन ढवळीकर यांना सत्तेत कदापी सामावून घेऊ नये अशी मागणी केली.
त्यांच्यासोबत प्रियोळ भाजपा कार्यकारिणीचे सदस्य केरीच्या सरपंच अनिशा गावडे, शिवराम नाईक,विठ्ठल नाईक, विनय खेडेकर, उमेश खेडेकर, वैशाली नाईक, मुक्ता नाईक, भावना नाईक, दर्शना नाईक, शेखर मडकईकर, अजित नाईक, धनिशा नाईक, दिगंबर तारी, सत्यवान शिलकर, भोपाल नाईक, मोहन खेडेकर, अमिना वाडकर, मिनू गावडे, संतोष भगत आदी उपस्थित होते.
फोंडा भाजपाचे गटाध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी यावेळी बोलताना मगो पक्षाला सरकार स्थापनेत समाविष्ठ करण्याबाबत मवाळ धोरण स्वीकारताना म्हणाले की सरकार स्थापनेत मगोचा समाविष्ट केल्यास हरकत नसून त्यांना महत्वाची मंत्रीपदे बहाल करू नये अशी मवाळ भूमिका घेतली.