सिराज, बुमराह, इशांत, शमीच्या भेदक माऱयासमोर इंग्लंडचा 120 धावांत धुव्वा, राहुल सामनावीर
वृत्तसंस्था/ लंडन
अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्या शतकी भागीदारीनंतर मोहम्मद शमी (नाबाद 56) व बुमराह (नाबाद 34) यांनी केलेली अभेद्य 89 धावांची भागीदारी आणि नंतर मोहम्मद सिराज, बुमराह, इशांत शर्मा, शमी यांच्या भेदक माऱयाच्या बळावर भारताने दुसऱया कसोटीच्या शेवटच्या दिवशी यजमान इंग्लंडवर 151 धावांनी दणदणीत विजय मिळवित पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या डावातील शतकवीर केएल राहुलला सामनावीरचा बहुमान मिळाला.
भारताने शेवटच्या दिवशी 8 बाद 298 धावांवर दुसरा डाव घोषित करून इंग्लंडला विजयासाठी 60 षटकांत 272 धावांचे आव्हान दिले होते. पण भारतीय वेगवान गोलंदाजांनी भेदक मारा करीत इंग्लंडचा दुसरा डाव 51.5 षटकांत केवळ 120 धावांत गुंडाळून शानदार विजय साकार केला. पहिल्या डावात चार बळी टिपणाऱया सिराजने यावेळी मोईन अली, सॅम करण यांना लागोपाठ बाद केल्यानंतर बटलरचा कडवा प्रतिकार मोडून काढत भारताच्या विजयातील महत्त्वाचा अडथळा दूर केला आणि अँडरसनचा एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळा उडवित 8 षटके बाकी असतानाचा भारताचा विजय साकार केला. त्याने 32 धावांत 4 बळी टिपले तर बुमराहने 33 धावांत 3, इशांत शर्माने 13 धावांत 2, शमीने 13 धावांत 1 बळी मिळविला. इंग्लंडच्या डावात कर्णधार रूटने सर्वाधिक 33 धावा केल्या तर बटलरने 25, मोईनने 13 धावा काढल्या. भारताकडून त्यांना 29 धावा अवांतराच्या रूपात मिळाल्या. अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला होता. तिसरा सामना लीड्स येथे 25 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
शमी-बुमराहची अभेद्य भागीदारी
भारताने पहिल्या डावात 364 धावा केल्यानंतर इंग्लंडने 391 धावा जमवित भारतावर 27 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताने चौथ्या दिवसअखेर 6 बाद 181 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून भारताने शेवटच्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला आणि शमी व बुमराह यांनी कसलेल्या फलंदाजांप्रमाणे फलंदाजी करीत नवव्या गडय़ासाठी 89 धावांची अभेद्य भागीदारी केली आणि संघाला पावणेदोनशेच्या जवळपास आघाडी मिळवून दिली. इंग्लंडमधील भारताची ही नवव्या गडय़ासाठीची सर्वात मोठी भागीदारी आहे. शमीने 70 चेंडूत नाबाद 56 धावा फटकावल्या तर बुमराहने 64 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या. शमीने मोईन अलीला उत्तुंग षटकार ठोकत कसोटी क्रिकेटमधील दुसरे अर्धशतक नोंदवले. या दोघांनी उपाहारावेळी भारताची आघाडी 259 धावांवर नेऊन ठेवली होती. उपाहारापर्यंत दोघांनी 77 धावांची भागीदारी केली होती. त्यांनी इंग्लंडच्या भेदक माऱयाला समर्थपणे तोंड देत इंग्लंडच्या विजयाच्या आशेवर पाणी टाकले होते.
पंत व इशांत शर्मा यांनी दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला आणि 37 धावांची भागीदारी झाल्यावर पंत 22 धावांवर बाद झाला आणि नंतर इशांत 16 धावांवर बाद झाल्यानंतर भारताची स्थिती 8 बाद 209 अशी झाली होती. त्यावेळी भारताला मोठी आघाडी मिळणार नाही, असेच वाटले होते. बुमराह व शमी यांनी मात्र शानदार फलंदाजी करीत इंग्लंडचे मनसुबे उधळून लावले. या दोघांसाठी रूटने क्षेत्ररक्षण पसरवले होते. उंच फटके मारण्याच्या प्रयत्नात त्यांचे झेल उडतील, अशी त्याची अपेक्षा होती. पण या दोघांनी निर्धाराने फलंदाजी करीत त्यांना चकित केले आणि हळूहळू भारताची आघाडी वाढवत नेत इंग्लंडला फ्रस्ट्रेट केले. क्षेत्ररक्षक दूरवर असल्याने शमी-बुमराह यांनी एकेरी दुहेरी काढत धावफलक हलता ठेवला. त्यांच्यावर उसळत्या चेंडूंचा माराही करण्यात आला. एक चेंडू बुमराहच्या हेल्मेटलाही लागला. पण न डगमगता दोघांनी फलंदाजी केली आणि अर्धशतकी भागीदारी नोंदवल्यावर प्रेक्षकांनी उभे राहून त्यांचे कौतुक केले. शमीने अँडरसनला फ्लिकचा चौकार मारल्यानंतर मोईनला अप्रतिम कव्हरड्राईव्हचा चौकार ठोकला. नंतर त्याला उंचावरून फटकाही मारला. रूटने यानंतर डावपेचात बदल करून दोन स्लिप व गली अशी पारंपरिक रचना लावली. बुमराहचा बचाव व शमीची आक्रमक फटकेबाजी यामुळे इंग्लंडचे खेळाडू बरेच वैतागले. रूट व अँडरसन यांनी त्यांना डिवचण्यासाठी हलकीशी बाचाबाचीही केली. पण त्यांच्यावर याचा काहीही परिणाम झाला नाही. उपाहारानंतरही हा जोम कायम ठेवत दोघांनी आणखी 12 धावांची भर घातल्यानंतर कोहलीने 8 बाद 298 धावांवर डावाची घोषणा केली आणि इंग्लंडला 272 धावांचे आव्हान दिले.
संक्षिप्त धावफलक ः भारत प.डाव 364, इंग्लंड प.डाव 391 (रूट नाबाद 180, बेअरस्टो 57, बर्न्स 49, अवांतर 33, सिराज 4-94, शमी 2-95, इशांत शर्मा 3-69), भारत दु.डाव 109.3 षटकांत 8 बाद 298 डाव घोषित (रोहित शर्मा 21, पुजारा 45, कोहली 20, रहाणे 61, पंत 22, जडेजा 3, इशांत शर्मा 16, शमी नाबाद 56 (70 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), बुमराह नाबाद 34 (64 चेंडूत 3 चौकार, अवांतर 15, मार्क वूड 3-51, मोईन अली 2-84, ऑली रॉबिन्सन 2-45, सॅम करण 1-42, अँडरसन 0-53). इंग्लंड दु.डाव 51.5 षटकांत सर्व बाद 120 (हमीद 9, रूट 33, बेअरस्टो 2, बटलर 25, मोईन अली 13, रॉबिन्सन 9, बर्न्स, सिबली, करण, वुड, अँडरसन प्रत्येकी 0, अवांतर 29, शमी 1-13, बुमराह 3-33, सिराज 4-32, इशांत शर्मा 2-13, जडेजा 0-5).