21 वर्षांनंतर ‘मिस युनिव्हर्स’चा ताज जिंकण्याची किमया
ऐलात, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तब्बल 21 वर्षांनंतर विश्वसुंदरीच्या ताजवर भारताचे नाव कोरले गेले. चंदिगढमधील हरनाज संधूने ‘मिस युनिव्हर्स 2021’ किताबावर मोहोर उमटवत भारताचा नावलौकिक वाढवला. यापूर्वी सुष्मिता सेन (1994) आणि लारा दत्ता (2000) या सुंदरींनी देशाचे नेतृत्त्व करत या पदकावर भारताचे नाव कोरले होते. आता हरनाज संधू ही विश्वसुंदरी होणारी तिसरी भारतीय ठरली आहे. तब्बल 21 वर्षानंतर भारताच्या शिरपेचात मानाचा मुकुट पुन्हा विराजमान झाला आहे. ‘मिस युनिव्हर्स 2021’चा ताज जिंकल्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हरनाज प्रचंड आनंदी दिसत होती. यावेळी तिने ‘चक दे फत्ते इंडिया… चक दे फत्ते’ अशा उत्स्फूर्त भावनाही व्यक्त केल्या.
इस्त्रायलमध्ये झालेल्या विश्वसुंदरी स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी रात्री उशिराने पार पडली. भारताच्या हरनाज संधूने तीन तासांच्या थेट स्पर्धेत मिस युनिव्हर्सचा किताब जिंकण्यापूर्वी अनेक फेऱया पार केल्या. तिने राष्ट्रीय पोशाख, इव्हिनिंग गाऊन, मुलाखत आणि स्विमवेअर फेरीत आत्मविश्वास आणि आकर्षकपणा सिद्ध केला. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत 75 हून अधिक सुंदरी सहभागी झाल्या होत्या. अखेरीस टॉप-3 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि पॅराग्वेच्या सौंदर्यवतींना मागे टाकत हरनाज संधूने ‘कॉस्मिक ब्युटी’च्या मुकुटावर आपले नाव कोरले. तसेच ‘टॉप-10’मध्ये पॅराग्वे, पोर्तो रिको, यूएसए, दक्षिण आफ्रिका, बहामास, फिलिपाईन्स, फ्रान्स, कोलंबिया आणि अरुबाच्या सुंदरींना मागे टाकले. हरनाझने सर्व फेरीत चांगली कामगिरी करत इतिहास रचला. उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर हॉस्ट स्टीव्ह हार्वेने संधूला आवडत्या प्राण्याबद्दल प्रश्न विचारला होता. यावेळी तिने आपल्याला ‘मांजर प्रचंड आवडतात’ असे उत्तर दिले होते.
हरनाझ संधूच्या विजयाची बातमी मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनच्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली. इस्त्रायलमध्ये आयोजित कार्यक्रमात हरनाझला मुकुट घातला गेला तो क्षण त्यांनी शेअर केला आहे. ‘नवीन मिस युनिव्हर्स आहे इंडियन’ अशी कॅप्शन त्या व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच क्लिपमध्ये मेक्सिकोची मिस युनिव्हर्स 2020 आंद्रिया मेझा हरनाजला ताज घालताना दिसत आहे.
चंदिगढमधील युवती
हरनाज संधू ही चंदिगढमधील शीख कुटुंबातील युवती आहे. ती पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. फिटनेस आणि योगाची आवड असलेल्या हरनाजने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तिने 2017 मध्ये ‘मिस चंदिगढ’चा किताब जिंकला होता. तसेच 2018 मध्ये तिला ‘मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया’चा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर तिने ‘मिस इंडिया 2019’मध्ये टॉप 12 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. त्यानंतर वर्षी सप्टेंबरमध्ये तिने ‘मिस दिवा युनिव्हर्स इंडिया 2021’चा मुकुट पटकावला होता.