न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप फायनल – जेमिसन, वॅग्नर
साऊदम्प्टन / वृत्तसंस्था
प्रतिकूल, आव्हानात्मक परिस्थितीत विराट कोहलीने संयमावर अधिक भर दिल्यानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप फायनल लढतीच्या दुसऱया दिवशी शेवटचे वृत्त हाती आले, त्यावेळी 3 बाद 146 धावांपर्यंत मजल मारली. उपाहारावेळी 2 बाद 69 अशी स्थिती असलेल्या भारताने त्यानंतर दुपारच्या सत्रात केवळ 51 धावांची भर घातली. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी विराट कोहली 124 चेंडूत 44 तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे 79 चेंडूत 29 धावांवर खेळत होते.
पहिल्या सत्राच्या तुलनेत दुसऱया सत्रात न्यूझीलंडच्या जलद गोलंदाजांनी अधिक शिस्तबद्ध मारा साकारला. डय़ूक्स चेंडूला उत्तम मुव्हमेंट असल्याच्या पार्श्वभूमीवर कोहलीने अगदी कॉलिन डे ग्रँडहोमसह न्यूझीलंडच्या जलद ताफ्याला सामोरे जाताना संयमी पवित्र्यावर अधिक भर दिला. विराटने आऊटसाईड ऑफस्टम्प असणारे जवळपास सर्व चेंडू सोडून दिले.
दुसरीकडे, कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराने एकवेळ खाते उघडण्यासाठी 36 चेंडू घेतले होते. नंतर वॅग्नरच्या गोलंदाजीवर कटच्या फटक्यावर चेंडू सीमापार गेल्यानंतर त्याचे खाते उघडले गेले. तत्पूर्वी, रोहित शर्मा (68 चेंडूत 34) व शुभमन गिल (64 चेंडूत 28) यांनी प्रारंभी समयोचित फलंदाजी साकारली असली तरी नंतर चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली.
या सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे पूर्ण वाया गेला असताना आणि खेळपट्टी अर्थातच सर्द असताना प्रतिस्पर्ध्यांना फलंदाजीला पाचारण करणे, हाच प्राधान्यक्रम असणार होता आणि किवीज कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकल्यानंतर अपेक्षापूर्ती केली. मागील दोन दिवसात येथे हवामानात बरेच बदल झाले असले तरी भारताने यापूर्वी जाहीर केलेला अंतिम संघच कायम राखला तर दुसरीकडे, न्यूझीलंड संघाने चारही जलद गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्पेशालिस्ट स्पिनर खेळवण्याऐवजी अष्टपैलू कॉलिन डे ग्रँडहोमला पाचवा सीम बॉलिंग पर्याय म्हणून संघात स्थान देणे पसंत केले.
इंग्लंडमध्ये प्रथमच एकत्रित सलामीला उतरत असलेल्या रोहित व गिल या सलामी जोडीने 62 धावांची भागीदारी साकारत आपला गेमप्लॅन व्यवस्थित अंमलात आणला होता. बोल्टच्या ट्रेडमार्क इनस्विंगर्सना निष्प्रभ करण्यासाठी रोहितने येथे ओपन स्टान्सवर भर दिला तर गिलने साऊदीच्या आऊटस्विंगर्सना सामोरे जाताना नेहमीपेक्षा आऊटसाईडवर स्टान्स घेणे पसंत केले.
नंतर काईल जेमिसनने रोहित शर्माला साऊदीकरवी तर वॅग्नरने शुभमन गिलला वॅटलिंगकरवी झेलबाद केले. चेतेश्वर पुजारा तिसऱया गडय़ाच्या रुपाने केवळ 8 धावांवर बाद झाला. त्याला बोल्टने पायचीत केले.
संक्षिप्त धावफलक ः भारत पहिला डाव ः 3 बाद 146 (विराट कोहली 124 चेंडूत नाबाद 44, अजिंक्य रहाणे 79 चेंडूत नाबाद 29, रोहित शर्मा 68 चेंडूत 34. जेमिसन, वॅग्नर, बोल्ट प्रत्येकी 1 बळी).