फॉर्म्युला 2 शर्यतीचा बनला पहिला भारतीय विजेता, मिक शुमाकर चॅम्पियन
वृत्तसंस्था/ साखिर, बहरिन
भारताचा नवोदित ड्रायव्हर जेहान दारुवालाने रविवारी नवा इतिहास निर्माण करताना येथे झालेल्या साखिर ग्रां प्रि फॉर्म्युला 2 शर्यतीचे जेतेपद पटकावले. हा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय ड्रायव्हर बनला आहे.
मायकेल शुमाकरचा मुलगा मिक शुमाकर हा फॉर्म्युला 2 चा चॅम्पियन बनला असून शुमाकर व डॅनियल टिक्टम यांचा कडवा प्रतिकार मोडून काढत 22 वर्षीय जेहानने या शर्यतीचे विजेतेपद पटकावले. जेहानने रायो रेसिंग कारमधून दुसऱया स्थानावरून सुरुवात केली होती तर टिक्टमने पोल पोझिशनवरून सुरुवात केली होती. टिक्टम जेहानला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत असताना शुमाकरने त्यांना मागे टाकत मुसंडी मारली. या तिघांतच नंतर पहिल्या तीन स्थानासाठी चुरस सुरू झाली आणि शेवटच्या दहा लॅप्स असताना जेहानने टिक्टमवर आघाडी घेतली आणि अखेरपर्यंत ती कायम ठेवत पहिले एफ 2 जेतेपद पटकावले. त्याचा जपानचा सहकारी युकी त्सुनोदाने दुसरे तर टिक्टमने तिसरे स्थान मिळविले.
मिक शुमाकरने या शर्यतीत एकही गुण मिळविला नसला तरी तो या वर्षाचा फॉर्म्युला 2 चॅम्पियन बनला आहे. पुढील मोसमात तो आता फॉर्म्युला वन शर्यतीत हास संघाकडून शर्यतीत भाग घेणार आहे. येथील शर्यतीत त्याला 18 वे स्थान मिळाले त्याचा चॅम्पियनशिप प्रतिस्पर्धी कॅलम इलॉटला दहावे स्थान मिळाले. शुमाकरने एकूण 215 गुण मिळविले तर दुसऱया स्थानावरील कॅलमचे 201 गुण झाले. युकी त्सुनोदाने 200 गुणांसह यात तिसरे स्थान मिळविले