पंतप्रधान मोदींचे अधिकाऱ्यांना निर्देश, अफगाण परिस्थितीवर मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानातून भारतात येऊ इच्छिणाऱया हिंदू आणि शीख लोकांना सर्व प्रकारचे साहाय्य करावे, असा निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे. अफगाणिस्तानातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक त्यांच्या नेतृत्वात मंगळवारी पार पडली. या बैठकीत अफगाणिस्तानशी संबंधित अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. मात्र याचा सविस्तर वृत्तांत देण्यात आला नाही.
या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथसिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, विदेश विभाग सचिव हर्षवर्धन श्रृंगला, अफगाणिस्तानातील भारताचे राजदूत टंडन आणि इतर अनेक ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत भारताच्या पुढच्या कृतीसंबंधीही चर्चा करण्यात आली. मात्र, ही बैठक गोपनीय असल्याने यासंबंधी पत्रकार परिषद घेण्यात आली नाही. सूत्रांकडूनही माहिती मिळू शकली नाही. भारताचे तालिबानशी संबंध कसे असतील यावर अद्याप निश्चित अशा प्रकारचे धोरण ठरविण्यग्नात आलेले नाही, असे समजते. मात्र तालिबानच्या एकंदर वर्तनावर ते ठरणार आहे, असेही तज्ञांचे मत आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती जशी विकसीत होत जाईल, त्या प्रमाणे भारताला प्रतिक्रिया द्यावी लागणार आहे, असाही मतप्रवाह आहे.